दीपक ढवळीकरांनी घेतली दामू नाईक यांची भेट
कोणताही वाद नसल्याचे दोघांचेही स्पष्टीकरण
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल गुरुवारी भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली आणि युतीसह विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी ती सदिच्छा भेट असल्याचा दावा केला आहे. याबाबत विचारणा केल्यावर ढवळीकर म्हणाले की, नाईक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. फोनवर बोलणे झाले होते म्हणून प्रत्यक्ष भेट घेतली आणि ती फक्त सदिच्छा भेटच होती. भाजप-मगोप युती चालूच असून ती पुढेही कायम राहाणार आहे. पर्रीकर मुख्यमंत्री असतानापासून युती चालू असून ती कोणी मोडलेली नाही असे निवेदन ढवळीकर यांनी केले. दामू आपले चांगले मित्र असून युती, जागा वाटप करण्याची वेळ आता नव्हे. ते नंतर ठरवणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले. दामू नाईक यांनी सांगितले की, ती सदिच्छा भेट होती. मगोप भाजपसोबत आहे आणि युतीमध्ये कोणताही वाद नाही. सर्व 40 मतदारसंघांत भाजपचे काम वाढवण्याचा इरादा आहे. मुख्यमंत्री व राज्यपालांची भेट हा सरकारी कामाचाच एक भाग आहे. सरकार स्थिर असून ते योग्य पद्धतीने चालत आहे. भाजपमध्ये शिस्तीला महत्त्व असून कोण काय बोलतो याची नोंद ठेवली जाते. पक्षश्रेष्ठीदेखील त्याची दखल घेतात आणि कोणी जर जबाबदारीने वागत नसेल तर योग्यवेळी कारवाई होते. पक्षाचा वचक सर्वांवर आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.