महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खोल समुद्रातील मालवाहू जहाज सुरक्षित

12:00 PM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आगीच्या घटनेनंतर 1 खलाशी बेपत्ता, 20 जण सुरक्षित, बचाव कार्य सुरूच

Advertisement

वास्को : गोव्याच्या समुद्र किनारपट्टीपासून 102 सागरी मैल अंतरावर दक्षिण पश्चिम दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या कंटेनर मालवाहू जहाजाला लागलेली भीषण आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अद्याप यश आलेले नाही. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे बचाव कार्यात व्यस्त असून जहाज सुरक्षित आहे. शॉर्ट सर्किटमुळे जहाजावर आगीची ठिणगी पडून जहाजावरील कंटेनरलाही आग लागल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या एका खलाशाचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेत सदर मालवाहू जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Advertisement

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरून ‘मार्स्क फ्रँकफर्ट’ हे मालवाहू जहाज श्रीलंकेतील कोलंबोला जात होते. या जहाजावर 160 मालवाहू कंटेनर आहेत. त्यापैकी 20 कंटेनरचे आगीमुळे नुकसान झाले आहे. गोव्याच्या सागरी किनाऱ्यापासून 102 सागरी मैलावर शुक्रवारी दुपारी हे जहाज संकटात सापडले. जहाजावर आग भडकल्याचे दिसून येताच जहाजावरील अग्निशामक यंत्रणेने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आग अधिकच भडकू लागल्याने जहाजावरील कंटेनरही उष्णतेमुळे पेट घेऊ लागले व या कंटेनर्सचा स्फोट होऊ लागला. त्यामुळे या जहाजावरील अधिकाऱ्यांनी मुंबईतील भारतीय तटरक्षक दलाकडे आपत्कालीन मदतीची विनंती केली.

भारतीय तटरक्षक दलाला माहिती मिळताच दलाची विविध ठिकाणी तैनात असलेली गस्ती जहाजे दुर्घटनाग्रस्त जहाजाकडे वळविण्यात आली. गोव्यातील तटरक्षक दलाची दोन जहाजे घटनास्थळी रवाना झाली. तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानानेही घटनास्थळी कूच केली. कंटेनर मालवाहू जहाज इंटरनॅशनल मेरिटाईम डेंजरस गुड्स (आयएमडीजी) हा माल घेऊन प्रवास करीत होते. तटरक्षक दलाने प्रतिकूल हवामानाला तोंड देत बचाव कार्याला सुऊवात केली. प्रथम मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात आले. तटरक्षक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जहाजावरील एक खलाशी बेपत्ता झाला होता. त्याचा शोध लागलेला नाही. यावेळी हे जहाज कारवार बंदरापासून 50 सागरी मैलांवर होते.

भारतीय तटरक्षक दलाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, जहाजाला लागलेली आग पसरण्यापासून रोखण्यास यश आलेले आहे. मात्र, लागलेली आग बुझविण्याचे काम अद्याप चालूच आहे. आयसीजीएस सम्राट, आयसीजीएस सचेत व आयसीजीएस सुजीत ही जहाजे या कामगिरीवर व्यस्त आहेत. डॉर्नियर हवाई जहाजाचीही मदत घेण्यात आली आहे. काल संध्याकाळी दुर्घटनाग्रस्त जहाज कारवारच्या किनाऱ्यापासून 17 सागरी मैलांवर पोहोचले होते. समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे आग बुझविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. या बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाने आणखी एक डॉर्नियर हवाई जहाज तैनात ठेवले आहे. दुर्घटनाग्रस्त जहाज ओढण्यासाठी मुंबईहून तटरक्षक दलाचे ठग जहाज घटनास्थळी रवाना झालेले आहे. ते आज सकाळपर्यंत घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाचे प्रदूषण विरोधी जहाज ‘समुद्र प्रहरी’ तैनात ठेवण्यात आलेले असून पर्यावरणाच्या रक्षणाची काळजी घेतली जात असल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. या जहाजावर आता 20 खलाशी असून सर्वजण सुखरूप आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article