For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदाच्या हंगामात द्राक्षे उत्पादनात घट

10:46 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
यंदाच्या हंगामात द्राक्षे उत्पादनात घट
Advertisement

बदलत्या हवामानाचा उत्पादनावर परिणाम : मनुकांचा दर घसरला : उत्पादक चिंतेत

Advertisement

बेळगाव : बदलत्या हवामानाचा द्राक्षे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा द्राक्षे उत्पादनात घट झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्षांचे उत्पादन होते. त्यानंतर विजापूर आणि इतर जिल्ह्यातही उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा उत्पादनात घट होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. बेळगाव जिल्ह्यात 13 हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्षाचे पीक घेण्यात आले आहे. यापैकी एका अथणी तालुक्यात 5 हजार 500 हेक्टर द्राक्षाचे पीक आहे. त्याबरोबरच कागवाड, रायबाग, हुक्केरी, चिकोडी आदी तालुक्यांमध्येही उत्पादन होते. यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने द्राक्षे मोहोर म्हणावा तसा आला नाही. त्यामुळे सरासरी 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे. द्राक्षावर प्रक्रिया करून सुकी द्राक्षे (मनुका) तयार केली जात आहेत. मात्र, सुक्या द्राक्षांनाही सरासरी 250 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर आहे. मात्र, यंदा मनुका देखील कमी दरात विकल्या जात आहेत. गतवर्षी सुमारे 80 हजार टन मनुकांचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा द्राक्षे उत्पादनात घट झाल्याने मनुकांचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.

उत्पादनासाठी खर्च

Advertisement

द्राक्षे पिकविण्यासाठी प्रति एकर मोठा खर्च येतो. वेली लागवड, वायर, खते, कीटकनाशक यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यानंतर काढणी, द्राक्षांवर प्रक्रिया, शेड उभारणी, मजुरीचा खर्च, वाहतूक, शीतगृहाचे भाडे आदींवर खर्च केला जातो. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. खर्च दुपटीने वाढल्याने द्राक्षे उत्पादनातून पिकविण्यासाठी केलेला खर्च तरी निघणार का? या चिंतेत उत्पादक आहेत. सुक्या द्राक्षांना किमान 200 रुपये प्रतिकिलो आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत आहे. मात्र, बागायत खाते आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उत्पादकांना अपेक्षित दरापासून वंचित राहावे लागत आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये द्राक्षे द्या

द्राक्षे साठविण्यासाठी शीतगृहे बांधावीत, नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई मिळावी, शाळा-अंगणवाडी केंद्रांमध्ये अंड्यांऐवजी पोषणमूल्य म्हणून द्राक्षे द्यावीत, उत्पादकांचे कर्ज माफ करावे, आदी मागण्याही द्राक्षे उत्पादकांनी केल्या आहेत.

यंदा द्राक्षाचे दर गडगडले

साधारण मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत द्राक्षे काढणीचे काम संपते. त्यानंतर सुक्या द्राक्षांवर प्रक्रियेच्या कामाला सुरुवात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात सुक्या द्राक्षांची आवक सुरू होते. मात्र, जिल्ह्यात सुकी द्राक्षे (मनुका) साठवण्यासाठी शीतगृह सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सांगलीला विक्री करावी लागत आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाचे दर गडगडले आहेत. मार्चच्या सुरुवातीला 170 ते 180 रुपये प्रतिकिलो असणारा द्राक्ष दर खाली आला आहे.

शीतगृह उपलब्ध करून द्या

जिल्ह्यात 13 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागायती आहेत. यंदा पावसाअभावी द्राक्ष बागायतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पादन कमी होईल. वाढत्या उन्हात द्राक्षांना अधिक मागणी असते. शासनाकडून शीतगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)

Advertisement
Tags :

.