डेकोरेटिव्ह पथदीपांवरील माळा बनल्या शोभेच्या वस्तू
वर्षभरापासून बंद पडल्याने नागरिकांतून नाराजी
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हजारो रुपये खर्च करून डेकोरेटिव्ह पथदीपांवर लाईटिंगच्या माळा लावण्यात आल्या. परंतु, सध्या यातील अनेक माळा बंद असून त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या लाईटिंगच्या माळा सध्या दिखाऊपणासाठीच लावण्यात आल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डेकोरेटिव्ह पथदीपांवर विविध आकारातील लाईटिंगच्या माळा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. विशेषत: महात्मा फुले रोड, आरपीडी रोड यासह शहरातील मुख्य मार्गांवर लाईटिंगच्या माळा लावण्यात आल्या. रात्रीच्या वेळी या लाईटिंगच्या माळा आकर्षक दिसत होत्या. दीड वर्षांपूर्वी शहराच्या अनेक भागात अशा प्रकारच्या लाईटिंगच्या माळा लावण्यात आल्या. यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, त्या बंद पडल्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. महात्मा फुले रोड येथील लाईटिंगच्या माळा बंद होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. त्यामुळे या माळा सध्या केवळ दिखाऊपणासाठी टांगण्यात आल्या आहेत. एकतर त्या माळांची दुरुस्ती करावी अन्यथा त्या काढून टाकाव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.