शतकपूर्तीनिमित्त वीरसौधची सजावट
प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती- निमित्त शहरात दि. 26 व 27 रोजी भरगच्च कार्यक्रम होणार असून येथील वीरसौधला आगळेवेगळे स्वरूप देण्यात आले आहे. तिरंगाच्या (ध्वज) कपड्याने वीरसौधची सजावट करण्यात आली आहे. वीरसौधमधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील गांधीजींचा पुतळा काळ्या रंगात होता. पुतळ्याची रंगरंगोटी करण्यात आली असल्याने पुतळा उठावदार दिसत आहे. महात्मा गांधीजी पंचा नेसून लेखन करत असलेले असा पुतळ्यात बदल करण्यात आला आहे. बाजूलाच सूत कताईचा चरखा ठेवण्यात आला आहे.
वीरसौधमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची सभा होणार असल्याने आकर्षक व्यासपीठ उभारण्यात येत आहे. वीरसौधला विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात झगमगाट झाला आहे. आवारात साफसफाईचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्मारकातील सर्व छायाचित्रांचे डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून छायाचित्रासमोर सेल्फी घेण्यासही उत्सुकता वाढली आहे.