पंचगंगा नदीतील माशांची घटती संख्या धोकादायक! चौदा प्रजातीच्या माशांची संख्या राहिली अगदीच अत्यल्प
रसायनयुक्त पाणी नदीत मिसळत असल्याचा परिणाम, मच्छिमारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बनतोय गंभीर
संग्राम काटकर कोल्हापूर
पंचगंगा नदी पात्रातील ताज्या माशांवर ताव मारणाऱ्या खवैय्यासाठी एक वाईट बातमी आहे. रसायनयुक्त पाणी सतत सोडण्याने नदीपात्रातील पाणी दुषित होऊन कमी-अधिक प्रमाणात मासे मरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दहा-पंधरा वर्षापूर्वी नदी पात्रात सापडणाऱ्या विविध प्रजातींच्या माशांची संख्या झपाट्याने घटत आहे. घटलेल्या माशांमध्ये वाम, वंज, शेंगटी, कटारणा, टिलाप, रोहू, मुळी, टाकरी, कटला, शेंगाळा, खिरीट, कोयरा, मशीड, घोगऱ्या या माशांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण नदीत गेल्या कित्येक वर्षांपासून बऱ्याच प्रजातींचे मासे अगदीच कमी सापडत असल्याचे खुद्द मच्छिमारच सांगताहेत. मुबलक प्रमाणात नदीतील मासे मिळत नसल्याने खवैय्यांना समुद्री माशांवर ताव मारावा लागत आहे.
गेल्या कित्येक दशकांपासून पंचगंगा नदी पात्रात मासेमारी कऊन भोई व कोळी समाजातील लोक चरितार्थ चालवत आहेत. या समाज बांधवांकडून पिढ्यानंपिढ्या कांचनवाडी, घाणवडे, आरळे, मालसवडे, धामोड, वळीवडे, तेरवाड, शिरोळ यासह विविध गावांजवळून गेलेल्या नदीपात्रात मासेमारी केली जात आहे. मासेमारीतून मिळत राहिलेल्या ताज्या पैशाच्या जोरावर अनेक कुटुंबांच्या राहणीमानात मोठा बदल झाला. मुले-मुली चांगले शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या कऊ लागल्या. इतकेच नव्हे तर नदी परिसरातील मराठा बांधवांसह अनेक जातींमधील कमी शिकलेल्या लोकांनीही किरकोळ नोकरीच्या मागे न लागता मच्छिमारीचा व्यवसाय स्वीकारला. हे सर्वजण नित्यनियमाने मासेमारी करत आहेत. ते मुबलक प्रमाणात वाम, वंज, शेंगटी, कटारणा, टिलाप, टाकरी, कटला यासह विविध प्रजातींचे मासे पकडून भोई व कोळी समाज बांधवांसारखा उदरनिर्वाह करत आहेत. समाजातील खवैय्येही मच्छिमारांनी पकडलेले ताजे मासे विकत घेऊन त्याच्यावर ताव मारत होते, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची वस्तूस्थिती होती. मात्र दहा-बारा वर्षांपासून परिस्थितीत बदल दिसतो आहे. मच्छिमारांना नदीतील विविध प्रजातीचे मासे सापडण्याचे प्रमाण पुर्वीच्या तुलनेत अगदीच कमी झाले आहे. ज्या प्रजातींचे मासे सापडतात, ते बहुसंख्य खवय्यांना मार्केटमधून गरजेनुसार मिळणे कठिण झाले आहे.
दुसरीकडे सतत मिसळत राहिलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित होऊन त्याचा फटका माशांना बसत आहे. मासे अक्षरश: तडपडून तडपडून मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तर वळीवडे, तेरवाड, शिरोळ यासह विविध गावांमधून जाणाऱ्या पंचगंगा नदी पात्रातील पाण्यातील मासे केवळ प्रदूषणामुळेच मेले आहेत. ज्या ज्यावेळी मासे मेल्याची घटना घडली आहे त्या त्यावेळी माशांचा खच पहायला मिळाला आहे. मेलेल्या माशांची दुर्गंधी तर नदी पात्राजवळून ये-जा करणाऱ्या माणसांना असह्य कऊन सोडत असते. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाने नदीतील पाणी प्रदुषण रोखून माशांना जीवदान द्यावे, अशी मागणी सर्वच स्तरातील नागरिक करताहेत. तीव्र आंदोलनाचा इशाराही देत आहेत. मात्र पाणी प्रदुषण व माशांच्या मरणाकडे ना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ गांभिर्याने पाहत आहे ना जिल्हा प्रशासन.
रिव्हर रांचिगद्वारे 65 हजार माशांची निर्मिती...
माशांची पैदास करण्यासाठी रिव्हर रांचिंग ही प्रक्रीया एक उत्तम पर्याय आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरातील सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) कार्यालयाने रिव्हर रांचिग प्रक्रीयेद्वारे रोहू प्रजातीच्या माशांची पैदास केली होती. त्यासाठी नदीतीलच रोहू प्रजातीचे नर-मादी घेऊन त्याच्यापासून बीज तयार केले होते. या बीजांमधून मिळालेले 65 हजार लहान मासे कासारी नदी पात्रात सोडले. नदीत हे मासे जगले तर आगामी काळात त्यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येईल, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
विविध जातीच्या माशांचीही पैदास आवश्यकच...
नदीच्या पाण्यातील विविध प्रजातीच्या माशांची संख्या घटल्याने मच्छिमारांना सध्या नदीत सापडणाऱ्या खवली, भगना, पालू, तगर, शिवडा या माशांवर अवलंबून रहावे लागत आहे. या माशांना नदी प्रदुषणापासून सुरक्षीत ठेवावे लागले. असे केले नाही तर हेही मासे प्रदुषणाच्या विळख्याने मऊन जातील, अशी भीती आहेत. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) कार्यालयाने रोहू माशांप्रमाणे इतर प्रजातीच्या माशांचीही पैदास कऊन ते नदी पात्रात सोडावेत लागतील.
योगेश आपटे (मच्छिमार, रा. शुक्रवार पेठ)