इलॉन मस्कसह दिग्गजांच्या संपत्तीत घसरण
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सची यादी जाहीर :116 अब्ज डॉलर्सची घसरण
नवी दिल्ली :
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार इलॉन मस्क यांची संपत्ती घसरुन 316 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. अलीकडेच त्यांच्या संपत्तीमध्ये 116 अब्ज डॉलरची घसरण पाहायला मिळाली.
बेजोस यांचेही नुकसान
असे असून सुद्धा इलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून अजूनही राहिलेले आहेत. असं मानलं जात आहे की पुढील दोन वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 2027 मध्ये मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनेयर बनू शकतात. ज्याप्रमाणे त्यांच्या कंपनीच्या समभागाची घसरण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याप्रमाणे पाहता वरीलप्रमाणे ते ट्रिलियनेर होणार का याबाबत सांशकता आहे. श्रीमंतांच्या यादीमध्ये जेफ बेजोस दुसऱ्या स्थानी असून त्यांची एकूण संपत्ती 212 अब्ज डॉलरची राहिली आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत 27.01 अब्ज डॉलरची घसरण पाहायला मिळाली.
झुकरबर्ग, अरनॉल्ट, एलिसन यांनाही फटका
श्रीमंतांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असणाऱ्या मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत गेल्या तीन महिन्यांमध्ये 3.35 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 204 अब्ज डॉलर्सची राहिली आहे. यापाठोपाठ यादीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती 167 अब्ज डॉलर्सवर घसरली आहे. त्यांचीही संपत्ती 9.20 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. पाचव्या नंबरवर वॉरेन बफे असून 24.3 अब्ज डॉलर्सची वाढ त्यांच्या संपत्तीत झालेली आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 166 अब्ज डॉलर्सची झाली आहे.
लॅरी एलिसन हे सहाव्या नंबरवर असून तीन महिन्यांमध्ये 30.3 अब्ज डॉलर्सचे नुकसान त्यांना सोसावे लागले आहे. यानंतर त्यांची संपत्ती 162 डॉलरवर आली आहे. सातव्या नंबरवरील बिल गेटस् यांची संपत्ती वाढीसह 161 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.