पाणी पातळीत घट... जलचरांना धोका
मासे दगावण्याचे प्रकार वाढले : नदी, तलाव प्रदूषित
बेळगाव : जिल्ह्यातील नदी, तलाव आणि जलाशयांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही नदी आणि जलाशये कोरडी पडल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमीतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मत्स्य खाते गांभीर्य घेणार का? हेच पहावे लागणार आहे. रायबाग, कागवाड आणि अथणी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत मासे दगावण्याचा प्रकार घडला आहे. त्याबरोबर इतर तलाव आणि नद्यांमध्ये दूषित पाण्यामुळे मासे, कासव, मगर, खेकडे, बेडूक आदी जलचरांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. नदी आणि तलावाचे पाणी दूषित झाल्याने जलचर प्राणी तडफडून मरू लागले आहेत. काही ठिकाणी पाणीच आटल्याने जलचरांचा जीव धोक्यात आला आहे.
वाढत्या उष्म्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट
वाढत्या उष्म्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. मार्कंडेय आणि मलप्रभा नदी काही ठिकाणी पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतील जलचर प्राणी दगावले आहेत. गतवर्षीही उन्हाळ्यात जलचर प्राण्यांना फटका बसला होता. यंदा देखील कमी झालेली पाण्याची पातळी आणि दुषित पाण्यामुळे प्राण्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नदी, तलाव, विहिरी आणि जलाशयांची पाणी पातळी खाली गेल्याने जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेबरोबर त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर बनत आहे.
मगरी नदीच्या पात्राबाहेर
कृष्णा अणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने मगरी पात्राच्या बाहेर दिसत असल्याचे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात मगरी नदी काठावर किंवा पात्राबाहेर फिरताना दिसत आहेत. महाराष्ट्राकडे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासन पातळीवर कोणता निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.
हिडकल-राकसकोप जलाशयातील मासे सुरक्षित
जिल्ह्यातील काही जलाशय आणि नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली आहे तर काही ठिकाणी दूषित पाणी निर्माण झाले आहे. मात्र हिडकल आणि राकसकोप जलाशयात सोडण्यात आलेली माशांची पिल्ले आणि मासे सुरक्षित आहेत. त्याबरोबर इतर तलावातूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- वसंत हेगडे (सहसंचालक, मत्स्य खाते)