दुचाकी-तिचाकीच्या निर्यातीमध्ये घसरण
प्रवासी वाहन निर्यातीत किंचीत वाढ : सियाम संघटनेची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया-युक्रेन आणि इस्त्राइल-गाजा यांच्यातील संघर्षामुळे जागतिक देशांमध्ये मंदीचे संकट दिसून येत आहे. सध्याच्या गोंधळलेल्या भू राजकीय स्थितीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये दुचाकी, तिचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर अर्थात सीयाम यांनी ही माहिती दिली आहे.
6.72 लाख प्रवासी वाहनांची निर्यात
वर्ष 2023-24 मध्ये प्रवासी वाहनांची निर्यात काहीशी वाढीव राहिली आहे. या दरम्यान भारताने 6.72 लाख प्रवासी वाहनांची निर्यात केली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवासी वाहनांच्या निर्यातीत नाममात्र एक टक्का वाढ दर्शविली आहे.
34 कोटी दुचाकींची निर्यात
दुसरीकडे दुचाकींच्या निर्यातीचा विचार करता 2023-24 आर्थिक वर्षात 34.58 कोटी दुचाकींची निर्यात करण्यात आली असून निर्यात 5.3 टक्के घसरणीत दिसून आली. तिचाकी वाहनांची निर्यात तीन लाखांवर पोहोचली असून वर्षाच्या आधारावर पाहता निर्यात 18 टक्के कमीच दिसून आली आहे. सियाम या संघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले की भूराजकीय अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भारताच्या वाहन निर्यातीत कमकुवत कामगिरी दिसून आली आहे.
निर्यातीत अडचणीचे कारण
रशिया-युक्रेन आणि इस्त्राइल-गाजा यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे विविध देशांमध्ये अस्थिर स्थिती दिसून येते आहे. ज्या देशांना भारत दुचाकी व व्यावसायिक वाहनांची निर्यात मोठ्या प्रमाणात करतो ते देश सध्या विदेशी चलनाशी संबंधित समस्येचा सामना करत असल्याचे विनोद अग्रवाल यांनी सांगितले. मात्र जानेवारी ते मार्च या तिमाहीत निर्यातीत चांगली सुधारणा दिसली आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये निर्यातीत आणखीन सुधारणा दिसतील अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.
लाल सागराच्या संकटाचा परिणाम
लाल सागरामध्ये संकटामुळे जहाजामार्फत होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम दिसून येतो आहे. मालवाहू जहाजांना थोडा लांबचा मार्ग अवलंबवावा लागत असल्याने पंधरा ते वीस टक्के इतका वेळ जास्त प्रवासाकरीता लागतो आहे. याआधी आठ आठवडे मालवाहतुकीसाठी लागत होते पण आता ते दहा आठवड्यांवर पोहोचले आहे. प्रवासाचा वेळ वाढल्याने खर्चावरदेखील ताण वाढतो आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.