‘आयटी’तील घसरणीचा बाजाराला फटका
सेन्सेक्स निर्देशांक 47 तर निफ्टी 7 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सप्ताहातील अंतिम सत्रात जागतिक बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. मात्र आयटी क्षेत्रातील घसरणीच्या नकारात्मक परिणामामुळे त्याचा फटका सेन्सेक्स व निफ्टी यांना बसल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स 47 अंकांनी घसरणीत राहिला होता.
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 47.77 अंकांनी घसरुन सेन्सेक्स निर्देशांक 65,970.04 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 7.30 अंकांच्या काहीशा घसरणीत राहून 19,794.70 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या सत्रात एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक 1.55 टक्क्यांनी प्रभावीत झाले. यासह विप्रो, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांसह टाटा मोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यात बँकिंग कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण राहिले. यावेळी अॅक्सिस बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 0.91 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तर एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, स्टेट बँक आणि एनटीपीसी व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभागही सोबत तेजीसह बंद झाले आहेत.
सप्ताहातील अंतिम सत्रात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी 0.03 टक्क्यांनी प्रभावीत होत 83.36 प्रति डॉलरवर राहिला आहे.
घसरणीची कारणे...
भारतीय भांडवली बाजारामध्ये टीसीएस, इन्फोसिस या सारख्या आयटी कंपन्यांचे समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. कारण बाजारांमध्ये नकारात्मकता दिसून आली. बाजारात खरेदीसाठी कोणतेही ठोस कारण नव्हते.
कच्चे तेल तेजीत
जागतिक पातळीवरील ब्रेंट क्रूड तेल 0.18टक्क्यांनी वधारुन 81.57 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मागील काही दिवसांपासून करत असलेल्या विक्रीचा प्रवास शुक्रवारीही कायम ठेवला आहे.