वस्तूंच्या निर्यातीत घट, व्यापार तूट वाढली
फेब्रुवारी 2026 मधील आकडेवारी : मार्च महिनाही आव्हानात्मक ठरु शकतो
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वस्तूंच्या निर्यातीत घट झाली आहे. चार महिन्यात प्रथमच, फेब्रुवारीमध्ये भारताची वस्तूंची निर्यात 0.8 टक्क्यांनी घसरून 36.61 अब्ज डॉलरवर आली. पश्चिम आशियातील संकटामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीत व्यत्यय येत असल्याने मार्च महिना आव्हानात्मक ठरू शकतो, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
वाणिज्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे फेब्रुवारीमध्ये वस्तूंची आयात 24.1 टक्क्यांनी वाढून 63.7 अब्ज डॉलरवर पोहोचली, ज्यामुळे देशाची व्यापार तूट 27.1 अब्ज डॉलरपर्यंत वाढली. तथापि, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये व्यापार तूट 14.4 अब्ज डॉलर होती. जानेवारीच्या तुलनेत व्यापार तूट कमी झाली आहे. जानेवारीमध्ये देशाची व्यापार तूट 34.7 अब्ज डॉलर होती.
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष आव्हानांनी भरलेले असूनही, एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान वस्तू आणि सेवांची निर्यात 790.86 अब्ज रुपये झाली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 5.8 टक्क्यांनी जास्त आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत केवळ वस्तूंची निर्यात 1.8 टक्क्यांनी वाढून 402.9 अब्ज डॉलरची झाली.
मार्च महिना देखील व्यापारी समुदायासाठी आव्हानांनी भरलेला असेल, कारण त्यांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम होईल. पश्चिम आशियातील संकट, विशेषत: होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम करत असून, व्यापारावर प्रतिकूल परिणाम होत आहे आणि वाहतुकीचा खर्च वाढत आहे.
अग्रवाल म्हणाले, ‘निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होईल, परंतु एकूण निर्यात सुमारे 860 अब्ज डॉलर्सची असण्याची शक्यता आहे. आम्हाला आशा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही सकारात्मक स्थितीत राहू.’
सेवांची निर्यात एक चतुर्थांशने वाढली
फेब्रुवारीमध्ये सेवांची निर्यात एक चतुर्थांशने वाढून 39.53 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. सेवांची आयात 13 टक्क्यांनी वाढून 16.38 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, ज्यामुळे सेवा व्यापारात 23.2 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त नफा झाला. तथापि, फेब्रुवारी महिन्यातील सेवा व्यापाराची आकडेवारी ही अंदाजित असून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नंतर जाहीर होणाऱ्या माहितीच्या आधारे त्यात सुधारणा केली जाईल.