For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घट

06:37 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घट
Advertisement

मात्र 48,000 कोटी कसे बुडाले? प्रश्न कायम : आरबीआयच्या अहवालामधून माहिती 

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात देशातील बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या कमी झाली, परंतु या प्रकरणांमध्ये गुंतलेली रक्कम गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. याचे मुख्य कारण म्हणजे कर्ज आणि आगाऊ रकमांशी संबंधित फसवणुकीची मोठी प्रकरणे, ज्याचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) वार्षिक अहवालानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात बँकांनी 48,021 कोटी रुपयांच्या फसवणुकीची नोंद केली आहे, जी मागील वर्षीच्या 32,803 कोटी रुपयांपेक्षा 46.4 टक्क्यांनी जास्त आहे. ही रक्कम 2023-24 या आर्थिक वर्षातील 11,013 कोटी रुपयांच्या तुलनेत चार पटींपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, फसवणुकीच्या प्रकरणांच्या संख्येत मोठी घट झाली होती. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, गेल्या वर्षीच्या 23,722 प्रकरणांच्या तुलनेत 10,114 प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजेच, प्रकरणांच्या संख्येत सुमारे 57 टक्के किंवा त्याहून कमी घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील 35,800 प्रकरणांच्या तुलनेत ही घट जवळपास 72 टक्के आहे.

सार्वजनिक-खासगी बँकांमधील संख्या कमी

आरबीआयने म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या कमी झाली आहे, परंतु त्यात गुंतलेली रक्कम वाढली आहे. पूर्वी कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल पेमेंट संबंधित प्रकरणे सर्वाधिक होती, तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कर्ज आणि आगाऊ रकमा संबंधित प्रकरणे सर्वात मोठी श्रेणी म्हणून समोर आली. एकूण फसवणुकीच्या रकमेत त्यांचा वाटा 85.5 टक्के होता.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक फटका

एकंदर फसवणुकीचे प्रमाण सार्वजनिक बँकांशी संबंधीत अधिक आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, फसवणुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 35,709 कोटींचा तोटा झाला. हा तोटा गेल्या वर्षीच्या 23,617 कोटींपेक्षा 51 टक्क्यांनी जास्त आहे. एकूण फसवणुकीच्या रकमेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा 74.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तथापि, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोंद झालेल्या प्रकरणांची संख्या एका वर्षापूर्वीच्या 6,916 वरून 5,418 पर्यंत कमी झाली आहे.

खासगी बँकांमध्येही रकमेत वाढ

खासगी बँकांमधील फसवणुकीची रक्कम 11,399 कोटींपर्यंत वाढली आहे, जी गेल्या वर्षीच्या 8,927 कोटींपेक्षा 27.7 टक्क्यांनी जास्त आहे. तथापि, एकूण फसवणुकीच्या रकमेत त्यांचा वाटा 23.7 टक्के होता, तर एकूण प्रकरणांमध्ये त्यांचा वाटा 39.1 टक्के होता.

क्रेडिट घोटाळा सर्वात मोठी चिंता ठरतेय

क्रेडिट घोटाळा ही सर्वात मोठी चिंता कर्ज आणि आगाऊ रकमांशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांची रक्कम 40,774 कोटींपर्यंत वाढली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 34 टक्के आणि आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत 357 टक्के अधिक आहे. एकूण फसवणुकीच्या रकमेत त्यांचा वाटा सुमारे 85 टक्के होता.

Advertisement
Tags :

.