विमान प्रवासी संख्येत जानेवारी महिन्यात घट
विमान प्रवासी संख्येत जानेवारी महिन्यात घट
बेळगाव : जानेवारी महिन्यात अनेक विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्याने याचा फटका बेळगाव विमानतळाला बसला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये 16 टक्क्यांनी प्रवासी संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विमानफेऱ्या रद्द न करण्याचे आवाहन प्रवाशांमधून करण्यात येत आहे. डिसेंबर 2023 मध्ये तब्बल 35 हजार 242 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर दोन मेट्रिक टन कार्गोची वाहतूक झाली होती. जानेवारी महिन्यात मात्र अनेक विमानफेऱ्या रद्द झाल्याने प्रवासी संख्येवर परिणाम झाला. केवळ 29 हजार 614 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने याचा फटका विमान कंपन्यांसोबत विमानतळावर आधारित व्यवसायांनाही बसला आहे.
आठ ते दहा दिवस विमानफेरी बंद राहिल्याने फटका
जानेवारी महिन्यात दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कवायती सुरू असल्याने बेळगाव-दिल्ली विमानफेरी काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली होती. बेळगावची प्रवासी संख्या दिल्ली विमानफेरीवर अवलंबून असल्याने याचा फटका प्रवासी संख्येवर दिसून आला. आठ ते दहा दिवस विमानफेरी बंद राहिल्याने प्रवासी संख्या झपाट्याने कमी झाली. याबरोबरच इतर शहरांनाही दिल्या जाणाऱ्या सेवा तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आल्या होत्या. याचा फटका प्रवासी संख्येला बसला.
कार्गो वाहतुकीत वाढ
सध्या बेळगावमधून दहा शहरांना थेट विमानफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेळगाव-बेंगळूर मार्गावर दररोज दोन, याबरोबरच दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, अहमदाबाद, सूरत, नागपूर, तिरुपती, जोधपूर व जयपूर या शहरांना बेळगावमधून सेवा उपलब्ध आहे. जमेची बाजू म्हणजे जानेवारी महिन्यात तब्बल 4 मेट्रिक टन कार्गोची वाहतूक झाल्याने कार्गो वाहतुकीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.