राणी चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे विनंती
प्रतिनिधी/ बेंगळूर
कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या संदर्भात सिद्धरामय्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून प्राचीन स्मारके, ऐतिहासिक स्थळे आणि अवशेष कायदा-1958 अंतर्गत राणी चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे समाधीस्थळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. वसाहतवादी राजवटीविरुद्ध सशस्त्र प्रतिकार करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी राणी चन्नम्मा एक होत्या. त्यांचे शौर्य आणि देशप्रेम देशातील लोकांना देशभक्तीसाठी प्रेरणा देत आहे, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
राणी चन्नम्मा यांच्या समाधीस्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करणे हे त्यांचा वारसा जपण्यासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असेल. चन्नम्मा यांच्या समाधीचे संरक्षण आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. या पवित्र स्थळाला तातडीने महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा करण्यासाठी मूल्यमापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याला द्यावेत, अशी विनंतीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.