चिकोडी-गोकाक जिल्हे घोषित करा!
आमदार शशिकला जोल्ले यांची मागणी : उत्तर कर्नाटक भागाच्या समस्यांकडे वेधले लक्ष
बेळगाव : अठरा विधानसभा मतदारसंघांचा बेळगाव हा मोठा जिल्हा आहे. सुलभ प्रशासनाच्या दृष्टीने चिकोडी व गोकाक जिल्ह्यांची घोषणा करावी, जिल्ह्याचे विभाजन झाल्यास विकासाला गती मिळणार आहे, अशी मागणी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी बुधवारी विधानसभेत केली.दुपारी भोजन विरामानंतर उत्तर कर्नाटकाच्या विकासावरील चर्चेत भाग घेत प्रत्येक अधिवेशनात शेवटचे तीन दिवस उत्तर कर्नाटकावर चर्चा होत होती. आता पहिल्याच आठवड्यात ही चर्चा सुरू आहे. आरोग्य, शिक्षण आदी प्रत्येक क्षेत्रात उत्तर कर्नाटक मागे आहे.
दक्षिण कर्नाटकाच्या तुलनेने विकासात उत्तर कर्नाटक भाग मागासलेला आहे. डॉ. नंजुंडप्पा अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना अनुदान दिले होते. बेळगाव, विजापूर, बागलकोट, हावेरी आदी उत्तर कर्नाटकातील जिल्हे मागासलेलेच आहेत. राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णांच्या शौर्याने पावन झालेला हा जिल्हा विकासात मागे आहे. येथील सरकारी शाळा-कॉलेजची संख्या दक्षिणेपेक्षा कमी आहे. उत्तरेतील अनेक सरकारी शाळा-कॉलेजचे निकाल शून्यावर आहेत. याचाही विचार झाला पाहिजे. 25 ते 30 हजार लोकांना एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
उत्तर कर्नाटकाचाही विकास व्हावा!
बेळगाव जिल्हा मोठा जिल्हा आहे. त्याचे विभाजन करून चिकोडी व गोकाक जिल्ह्यांची घोषणा करावी. निपाणीत कारखानदारी वाढवावी. शेजारच्या महाराष्ट्रात एमआयडीसीमध्ये कर्नाटकातील तरुणाई उद्योगधंद्यासाठी जाते. त्यांना इथेच कामे मिळवून द्यावीत. विणकरांचे जीव वाचवण्यासाठीही सरकारने पुढाकार घ्यावा. दक्षिणेच्या धर्तीवरच उत्तर कर्नाटकाचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.