‘स्वायत्त कोकण' घोषित करा...अन्यथा तीव्र आंदोलन! जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे
लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी केले रास्ता-रोको
रत्नागिरी प्रतिनिधी
कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रावर झालेल्या अन्यायासाठी विरोधात समृद्ध कोकण संघटना, स्वराज्यभूमी कोकण आंदोलन यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण मंगळवारी सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. त्यानंतर स्वायत्त कोकण झालाच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी जयस्तंभ येथे रास्ता-रोको केल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
हे आंदोलन संजय यादवराव, बावा साळवी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली करण्यात आले. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईसह कोकणात २५ जागांवर विधानसभेला समृद्ध कोकण संघटना उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा संजय यादवराव यांनी यावेळी केली. आमरण उपोषणात आंबा बागायतदारांना कर्जमाफी मिळावी, या मुख्य मागणीसह पर्यटन वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषी क्षेत्रालाही चांगले दिवस यावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले. न्याय हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचे सांगितले. गेली ७५ वर्षे कोकण दुर्लक्षित आहे. ३८ टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे, तरी पायाभूत सुविधांची वानवा आहे. समृद्ध कोकण संघटनेने स्वायत्त कोकण हवे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत नाही. म्हणून ठेकेदार बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले. कोकण विकास प्राधिकरण मंजूर आहे. परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. ही अनास्था संपावी, यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु स्वायत्त कोकण ही आमची प्रमुख मागणी आहे, ती शासनाने पूर्ण केली पाहिजे, अन्यथा आमचा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा यादवराव यांनी दिला.