आणखी 25 तालुक्यांची ‘दुष्काळग्रस्त’ घोषणा लवकरच
महसूल मंत्री डॉ. परमेश्वर यांची माहिती : दुष्काळाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरूच
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही; ती टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात 101 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आणखी 25 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्यास पात्र ठरले असून, त्यांची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.
बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानाजवळ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब झालेला नाही. खरीप आणि रब्बी हंगाम संपेपर्यंत आढावा घेण्याचे काम सुरूच राहील. मागील वेळी सुमारे 200 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. यावेळीही 200 हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची शक्मयता आहे. किनारपट्टीचा भाग वगळता सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त यादीतून तालुक्यांना वगळलेले नाही
काही आमदारांनी आपल्या तालुक्मयांचा समावेश दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत न केल्याबद्दल केलेल्या तक्रारींवर प्रतिक्रिया देताना डॉ. परमेश्वर म्हणाले, तीव्र दुष्काळ असूनही आपले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले गेले नाहीत, याची चिंता करण्याची कोणालाही गरज नाही. संपूर्ण राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्यामध्ये राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. काही तालुके मनमानीपणे वगळण्यात आले, हा आरोप निराधार आहे. आधी जाहीर केलेल्या यादीत विरोधी पक्षातील आमदारांचे तालुके नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.
जर राज्य सरकारने स्वत:हून दुष्काळग्रस्त भाग जाहीर केले, तर त्यांना केंद्राकडून मदत मिळणार नाही. केंद्राकडून दुष्काळ निवारण निधी मिळवण्यासाठी संयमाने वागणे आपल्या हिताचे आहे. दुष्काळग्रस्त भागांची घोषणा केंद्र सरकारच्या नियमांनुसार केली जाते; राज्य सरकार स्वत:चे निर्णय घेऊन अशी घोषणा करू शकत नाही. उपग्रहाद्वारे घेतलेल्या सॅटेलाईट इमेजेस प्रतिमांची तपासणी केंद्राकडून केली जाईल, प्रत्यक्ष पाहणीही करतील. अखेर वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केल्यानंतर दुष्काळी तालुक्यांची घोषणा होते. ही बाब मी अधिवेशनादरम्यान स्पष्ट केली आहे, असे परमेश्वर यांनी सांगितले.