‘ऑपरेशन सिंदूर’मधून शत्रूला निर्णायक उत्तर
अग्निवीर दीक्षांत समारंभात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचे प्रतिपादन : पाचव्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या भारतीय सैन्याने पश्चिमेकडील शत्रूला अचूक, योग्य आणि निर्णायक उत्तर दिले आहे. नवीन तांत्रिक युद्धात अग्निवीरांनी एनजीडब्ल्यू, अँटीड्रोन पद्धतीचा वापर करून शत्रूला गारद करून हे ऑपरेशन यशस्वी केले. भविष्यात अशा नवीन तांत्रिक युद्धासाठी तुम्हालाही पूर्णपणे तयार राहावे लागेल. ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडाल, असा विश्वास मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांना दिला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये अग्निवीरांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटात गुरुवारी कॅप्टन तळेकर मैदानावर पार पडला. अग्निपथ योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या 659 अग्निवीरांनी 31 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आज देशसेवेत रुजू झाले. यावेळी झालेल्या परेडचे नेतृत्व अग्निवीर गजानन राठोड यांनी केले. लेफ्टनंट कर्नल दिग्विजय सिंह हे परेडचे अॅडज्युनंट होते. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अग्निवीरांना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अग्निवीरांचे पालक, रेजिमेंटचे सेवारत आणि निवृत्त अधिकारी, कर्मचारी, बेळगावातील मान्यवर, एनसीसी कॅडेट्स आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अग्निवीरांनी राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र धार्मिक ग्रंथांच्या उपस्थितीत शपथ घेतली. यावेळी भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या इन्फंट्रीपैकी एक असलेल्या मराठा इन्फंट्रीच्या समृद्ध वारशाची आणि वैभवाची यावेळी आठवण करून देण्यात आली. सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्वदेखील यावेळी अधोरेखित करण्यात आले. कॅप्टन तळेकर मैदानावर शानदार पथसंचलन पार पडले.
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांकडून मानवंदना स्वीकारली. यानंतर अग्निवीरांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मी सर्वप्रथम अग्निवीरांच्या पालकांचे आणि नातेवाईकांचे अभिनंदन करतो, ज्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि प्रयत्नांमुळे तुम्ही या पदावर पोहोचू शकलात. केवळ मराठा लाईट इन्फंट्रीच नाही तर संपूर्ण भारतीय लष्कर परिवाराच्यावतीने मी तुम्हा सर्वांचे आमच्या गौरवशाली रेजिमेंटलमध्ये सामील होण्यासाठी स्वागत करतो. आम्ही, तुम्ही सामान्य नागरिक होता. आजपासून तुमचे एका शिस्तबद्ध सैनिकामध्ये रुपांतर झाले आहे. ही शिस्त तुम्हाला जीवनात सदैव उपयुक्त ठरणार आहे. आजपर्यंतच्या प्रवासात तुम्ही कठोर परिश्रम घेतले आहेत. आज तुमचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तुम्ही गेले सात महिने अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड देऊन सर्व परिस्थितीचा निर्भयपणे सामना केलात. हे प्रशिक्षण खडतर असले तरी त्यामुळेच तुमच्यातील जिद्द, जोश व संयम यांचे दर्शन घडले आहे. येत्या चार वर्षांत तुम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाच्या कसोटीवर तुम्ही उतराल आणि एक सच्चा देशभक्त अग्निवीर होऊन राष्ट्र निर्माणासाठी आपले योगदान तुम्ही देणार आहात, याबद्दल मला खात्री आहे. म्हणूनच तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.
आजचा दिवस भारतीय सैन्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज देशभरातील विविध प्रशिक्षण संस्थांमधील हजारो प्रशिक्षित अग्निवीर एकाचवेळी भारतमातेची सुरक्षा, एकता, अखंडता आणि सार्वभौमत्त्व राखण्यासाठी शपथ घेत आहेत. केवळ देशाचीच सुरक्षा नाही तर तुम्हाला देशाच्या विकासातही योगदान द्यावे लागेल. लक्षात ठेवा, तुम्हाला लाखो लोकांमधून निवडले गेले आहे. कारण तुमच्यातील कठोर परिश्रम करण्याची वृत्ती आम्ही पाहिली आहे. लवकरच तुम्ही तुम्हाला नेमून दिलेल्या ठिकाणी रुजू होणार आहात. तेथे कठोर परिश्रम, निष्ठा आणि इमानदारी यांचे प्रदर्शन घडवत एक उत्तम अग्निवीर म्हणून तुमच्या कामाचा ठसा उमटवून तुम्ही इन्फंट्रीची आणि देशाची शौर्यपताका फडकवत ठेवाल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर शरकत मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली.