For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या बसस्थानकापर्यंत बसेस सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय

10:50 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या बसस्थानकापर्यंत बसेस सोडण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय
Advertisement

गेल्या दोन महिन्यापासून बसेस जुन्या बसस्थानकापर्यंत आणणे-सोडणे बंद : प्रवाशांना नाहक त्रास

Advertisement

खानापूर : येथील जुन्या बसस्थानकापर्यंत बस सोडण्यात याव्यात, या मागणीसाठी शहरवासियांची जाहीर बैठक येथील शिवस्मारकात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. सुरुवातीला पंडित ओगले यांनी उपस्थितांचे स्वागत करून बस राजा छत्रपती चौकातून सोडण्यात याव्यात, यासाठी विचारविनिमय करावा, असे आवाहन केले. यानंतर बैठकीत चर्चा होऊन कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पालकमंत्री सतिश जारकीहोळी आणि जिल्हा बस वाहतूक नियंत्रकांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. खानापूर येथील जुन्या बसस्थानकातून गेल्या 24 वर्षांपासून बस सोडण्यात येत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापासून बस जुन्या बसस्थानकापर्यंत आणण्याचे आणि सोडण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुन्हा बस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडाव्यात, या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

मात्र बस आगारप्रमुखांनी जुन्या बसस्थानकापर्यंत बसेस सोडण्याबाबत निर्णय घेतला नसल्याने मंगळवारी जाहीर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीत प्रकाश चव्हाण, बाळाराम सावंत, संजय कुबल, प्रकाश देशपांडे, वसंत देसाई, अमृत पाटील, प्रमोद दलाल, रवी काडगी यांची भाषणे झाली. यावेळी सर्वांनी बस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडण्यात याव्यात, यासाठी लढा उभारण्यात यावा, तसेच आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अन्यथा उग्र लढ्याचा निर्णय घेण्यात यावा, अशाही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यानंतर चर्चा करून कमिटीची स्थापना करण्यात आली असून या कमिटीमार्फत पुढील निर्णय घेण्यात यावेत, असे ठरविण्यात आले. त्याचबरोबर येत्या चार दिवसात पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन देणे आणि जिल्हा बस वाहतूक नियंत्रक यांनाही निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यानंतरही जर बस जुन्या स्थानकापर्यंत सोडण्यात आल्या नसल्यास उग्र आंदोलन हाती घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस  नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.