हलगा गाव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय
ग्राम पंचायत-देवस्थान पंचसमितीच्या बैठकीत निर्धार : निर्णयाचे गावकऱ्यांतून स्वागत-समाधान
वार्ताहर/सांबरा
हलगा गाव पूर्णपणे डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत व देवस्थान पंचसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे गावकऱ्यांतून स्वागत केले जात असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात यात्रा, मिरवणूक व लग्नसराईत तरुणांचा कल डॉल्बीकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. डॉल्बीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेकांच्या कानाला इजा पोहोचली आहे, तर हृदयरोग रुग्णांना याचा धोका जाणवत आहे. अनेक जाणकार नागरिकांतून डॉल्बीवर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे, असा सूर ऐकावयास मिळत होता. परंतु तरुणांच्या उत्साहापुढे जाणकार नागरिकांच्या मतांकडे दुर्लक्ष केले जात होते. मागील महिन्यात हलगा गावामध्ये झालेल्या महालक्ष्मी यात्रेमध्ये प्रत्येक गल्लीच्या युवक मंडळांनी डॉल्बी लावून वाजतगाजत श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यामुळे अनेकांतून नाराजीचा सूर उमटला होता.
याचा सारासार विचार करून जाणकार नागरिकांनी डॉल्बीवर बंदी आणावी, असे विचार व्यक्त केले. याची दखल घेत हलगा ग्राम पंचायत सदस्य व देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला व ग्रा. पं. व देवस्थान पंचमंडळीची बैठक घेऊन डॉल्बीवर गावात यापुढे बंदी आणावी, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यामुळे या निर्णयाचे स्वागत हलगा गावातील जाणकार नागरिक, तसेच सुजाण तरुणांकडून केले जात आहे. परिसरामध्ये डॉल्बीमुक्तीचा निर्णय घेऊन परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे. यापुढे गावांमध्ये डॉल्बीचे आयोजन केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा ठराव हलगा ग्रा.पं. ने केला असून याची प्रत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. डॉल्बीमुक्तीचा निर्णय घेतल्यामुळे हिरेबागेवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी हलगा ग्रामपंचायतचे कौतुक केले आहे. बैठकीस ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मी गजपती, उपाध्यक्ष चेतन कुरंगी, सदस्य सदानंद बिळगोजी, गणपत मारिहाळकर, भुजंग सालगुडे, सागर कामानाचे, कल्पना हनमंताचे, सुजाता देसाई, धाकलु बिळगोजी, चारुकीर्ती सैबन्नावर, मोनाप्पा घोरपडे, बाबू देसाई, कृष्णा कणबरकर, पिराजी मोरे, शिवाजी संताजी, अशोक पायाक्का आदी उपस्थित होते.
संस्कृतीकडून विकृतीकडे
पूर्वी हिंदू संस्कृतीत सण, उत्सवावेळी व धार्मिक कार्यक्रमात मंगलवाद्य वाजवत होते.या मंगलवाद्यांमध्ये सनई, टाळ, ढोल, तबला यांचा समावेश होता. या वाद्यांमुळे परिसर मंगलमय होत होता व धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जात होते. परंतु संस्कृतीतून विकृतीकडे तरुणाई जात असताना या सनई वाद्याची जागा बँड वाद्य, झांजपथक, बेंजो व आता डॉल्बीने घेतली आहे. संस्कृतीकडून विकृतीकडे जात असल्याचे चित्र आज समाजामध्ये दिसत होते. या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा आपण विकृतीकडून संस्कृतीकडे जाण्यासाठी मंगलवाद्यांचा उपयोग येणाऱ्या धार्मिक कार्यात करणे गरजेचे आहे.