ब्रिटनचे एफ-35 विमान ‘खंडित’ होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या निमित्ताने केरळमध्ये उतरविण्यात आलेले ब्रिटनचे एफ-35 हे रडावर न दिसणारे युद्ध विमान खंडित (डिसमँटल) करण्याचा निर्णय ब्रिटीश तंत्रज्ञांनी आणि ब्रिटनच्या सरकारने घेतला आहे. हे विमान परत ब्रिटनला घेऊन जाण्याची त्या देशाची योजना आहे. तथापि, अद्यापी, या विमानात नेमका कोणता दोष निर्माण झाला होता, हे इतक्या दिवसांच्या नंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता हे विमान सुटे करुन व्यापारी नौकेतून नेले जाण्याची शक्यता आहे. या विमानाचे सुट्या भागात रुपांतर करणाऱ्या तज्ञांचे एक दल लवकरच भारतात येणार आहे. या विमानाची दुरुस्ती केरळमध्ये करता येणे शक्य नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे ते सुट्या भागांमध्ये खंडित केले जाईल. नंतर ब्रिटीश नौदलाची एक मोठी नौका भारतात येऊन हे विमान ब्रिटनला परत घेऊन जाईल, असे त्या देशाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकरण काय आहे...
ब्रिटनच्या एका विमानवाहू नौकेवरुन उ•ाण केलेले त्या देशाचे एफ-35 बी हे विमान 14 जूनला तांत्रिक दोषामुळे केरळच्या थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले होते. या विमानातील इंधन संपत आल्याने त्याचे तातडीने लँडिंग करावे लागले, असे कारण या विमानाच्या चालकाने दिले. हे विमान रडारवर न दिसणारे असूनही भारताच्या रडार यंत्रणेने ते भारताच्या आकाशात येताच ‘पकडले’ होते, अशी माहितीही देण्यात आली होती. त्यामुळे भारताची रडार क्षमता पडताळण्यासाठीच ते भारतीय आकाशात हेतुपुरस्सर सोडले होते, असेही बोलले जात आहे. तथापि, यासंबंधी अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. तेव्हापासून हे विमान आणि त्याचा चालक विमातळावरच आहेत. आता हे विमान सुट्या भागांमध्ये मोडून ब्रिटीश नौदलाच्या मोठ्या विमानातून ब्रिटनला परत नेले जाणार आहे. या विमानाला भारतातून जाताना परंपरेनुसार सभारंभपूर्वक निरोप दिला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.