शहरात 25 कूपनलिका खोदण्याचा निर्णय
महानगरपालिकेचा पुढाकार : पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : शहरातील बहुतांश कूपनलिकांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला असतानाही महानगरपालिका आणखी 25 कूपनलिका खोदण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांमध्ये 880 सरकारी कूपनलिका आहेत. यापैकी 786 कूपनलिकांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट अॅण्ड फायनान्स (केयुआयडीएफसी)ने दिला आहे. दर तीन महिन्यांतून एकदा या संस्थेकडून शहरातील कूपनलिका, विहिरीतील पाण्याचे नमुने ताब्यात घेतले जातात. प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने पाठवून 21 घटकांची चाचणी केली जाते.
यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत जास्त क्षार, फ्लोराईड, पाण्याचा रंग बदलणे यासह अन्य धोकादायक घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कूपनलिका व विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने हिडकल किंवा राकसकोप जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र, याचे गांभीर्य नसलेल्या महानगरपालिकेने पुन्हा कूपनलिका खोदण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सात ते आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काही वसाहतीतील रहिवासी कूपनलिकांवर अवलंबून आहेत. एलअॅण्डटीकडून पुरवण्यात येणारे पाणी पुरत नसल्याने अनेक जणांना टँकरवरदेखील अवलंबून रहावे लागत आहे. त्यातच बेळगाव उत्तर भागात 80.09 लाख रुपये खर्च करून 25 नवीन कूपनलिका खोदण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
चाचणी केल्यानंतरच पाण्याचा वापर
शहरात पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध वसाहतींमध्ये 25 कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन खोदण्यात आलेल्या कूपनलिकांच्या पाण्याची चाचणी केल्यानंतरच त्या पाण्याचा उपयोग केला जाईल. आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
- मंगेश पवार, महापौर