राज्यातील तीन जागांचा आज फैसला
विधानसभा पोटनिवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या शिग्गाव, चन्नपट्टण आणि संडूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होईल. मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजप-निजद युतीला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळण्याचे अनुमान होते. हे अनुमान सत्य ठरेल का, याविषयी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
तिन्ही मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. शिग्गावमध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे पुत्र भाजपकडून भरत बोम्माई व काँग्रेसतर्फे यासीर अहमद खान पठाण यांनी पोटनिवडणूक लढविली. चन्नपट्टणमध्ये माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी निजदतर्फे व काँग्रेसकडून माजी मंत्री सी. पी. योगेश्वर तसेच संडूरमध्ये काँग्रेसकडून खासदार ई. तुकाराम यांची पत्नी अन्नपूर्णा व भाजपतर्फे बंगारु हनुमंत यांनी निवडणूक लढविली होती.
चन्नपट्टणमधील मतमोजणी रामनगरमधील सरकारी अभियांत्रिकी मत्हाविद्यालयात तर शिग्गावची मतमोजणी हावेरी जिल्ह्यातील देवगिरी येथील सरकारी अंभियांत्रिकी मतहाविद्यालयात होईल. त्याचप्रमाणे संडूर मतदारसंघातील मतमोजणीची व्यवस्था बळ्ळारीतील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये करण्यात आली आहे.