मंत्र्यांच्या यादीवर आज फैसला
हिरवा कंदील मिळाल्यास उद्या नूतन मंत्र्यांचा शपथविधी
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद सोमवारी दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डी. के. शिवकुमार यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया याच आठवड्यात पूर्ण केली जाईल, असे सांगितले आहे.
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ नवी दिल्लीतील आंदोलनामुळे लांबणीवर पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय कुतूहल निर्माण झाले आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध मुद्द्यांवर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक पार पडली. मंगळवारी शिवकुमार, सिद्धरामय्या व बी. के. हरिप्रसाद काँग्रेसश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा करतील.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिवकुमार यांनी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल, ही प्रक्रिया याच आठवड्यात पूर्ण केली जाईल, असे सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी किंवा दुपारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय मुगय सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर मंत्र्यांच्या यादीला हिरवा कंदील दाखविला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुधवार 29 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्य नेत्यांनी आणि हायकमांडने मंत्र्यांनी स्वतंत्र यादी तयार केली असून आहे. त्यामुळे कोणाकोणाला मंत्रिपदे मिळणार, याविषयी राज्य काँग्रेस गोटात उत्सुकता ताणली आहे. मंत्र्यांच्या यादीला संमती मिळाल्यास बुधवारीच लोकभवनमध्ये नूतन मंत्र्यांचा शपथविधी संपन्न होईल.
कोणकोण शर्यतीत?
मंत्रिपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ आमदार आणि युवा आमदारांमध्ये रस्सीखेच आहे. लक्ष्मण सवदी, सी. पी. योगेश्वर, पुट्टरंगशेट्टी, सलीम अहमद, एम. कृष्णप्पा, चेलुवरायस्वामी, एस. एस. मल्लिकार्जुन, रघुमूर्ती, रुद्रप्पा लमाणी, मधू बंगारप्पा आणि अजय सिंग यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तर अप्पाजी नाडगौडा आणि यशवंतरायगौडा पाटील, बसवराज रायरे•ाr आणि शिवराज तंगडगी, श्रीनिवास माने आणि संतोष लाड यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे. तसेच अल्पसंख्याक समुदायातून जमीर अहमद खान, तन्वीर सेठ आणि रिझवान अर्शद यांच्यात चढाओढ आहे. महिला गटातून आरती कृष्ण यांच्या नावाची चर्चा आहे.