ऊसदराबाबत दोन दिवसांत निर्णय
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शेतकरी-कारखानदारांमधील मध्यस्थी यशस्वी
प्रतिनिधी/ बेळगाव
ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी व साखर कारखानदारांमध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. रविवार सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर दोन्ही बाजू तोडग्याच्या जवळ आल्या असून ऊसदराचा अंतिम निर्णय दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे.
सकाळपासून ते रात्रीपर्यंत सुवर्णविधानसौध व सर्किट हाऊसमध्ये मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी साखर कारखानदार, शेतकरी नेते व लोकप्रतिनिधींसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या. सुमारे 10 तास चाललेल्या या चर्चेत 9 मंत्री, सुमारे 70 आमदार व 80 पैकी 79 साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी नेते सहभागी झाले. दोन्ही बाजूंच्या मागण्या व आर्थिक अडचणी विचारात घेऊन परस्पर सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केंद्र सरकारकडून साखरेची एमएसपी निश्चित झाल्यानंतर त्यानुसार ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेतील प्रस्तावाला कारखानदारांनी सहमती दर्शविल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. मात्र अंतिम दराची रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही. शेतकरी आणि कारखानदार आपापसांत चर्चा करून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार आहेत.
शेतकऱ्यांचे जीवन सरकारसाठी महत्त्वाचे आहे. शेतकरी व साखर कारखानदार दोघांच्याही पाठीशी सरकार उभे राहील. शेतकऱ्यांशिवाय आम्ही काहीच नाही. केंद्र सरकारशी चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा विश्वास असून त्याला राज्य सरकारचा पाठिंबा आहेण् असे असे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
ऊसदराच्या प्रश्नावरून दोन्ही बाजू आपल्या मागण्यांवर ठाम असतानाही मुख्यमंत्र्यांनी चर्चा सुरू ठेवली. सुवर्णविधानसौधमधील बैठकीनंतर सर्किट हाऊसमध्येही चर्चेच्या पुढील फेऱ्या घेण्यात आल्या. अखेर तोडग्याच्या दिशेने सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत. आता दोन दिवसांत जाहीर होणाऱ्या अंतिम निर्णयातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती दर मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.
या चर्चेप्रसंगी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री संतोष लाड, आमदार यशवंतरायगौडा पाटील, आमदार एन. एच. कोनरे•ाr, शेतकरी नेते बडगलपूर नागेंद्र, चुन्नप्पा पुजारी यांच्यासह साखर कारखानदारांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
