मासिक पाळीच्या रजेचा निर्णय ऐतिहासिक : सुरजेवाला
बेंगळूर : सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांना मासिक पाळीच्या काळात प्रत्येक महिन्यात एक दिवस पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल एआयसीसीचे सरचिटणीस तथा कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. या निर्णयाचे वर्णन करताना रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, हे एक धाडसी पाऊल आहे. कर्नाटक सरकारने महिलांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. मासिक पाळीच्यावेळी महिलांना होणाऱ्या वेदना, आरोग्य संवेदनशीलता ओळखून पगारी रजा जाहीर केल्याने महिलांच्या स्वावलंबनासह आरोग्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आधीच लागू केलेल्या पाच गॅरंटी योजनांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे सातत्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.