‘चिन्नास्वामी’वरील आयपीएल सामन्यांबाबत उद्या निर्णय
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती : केएससीए, आरसीबी शिष्टमंडळाकडून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची विनंती
बेंगळूर : बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याच्या परवानगीबाबत बुधवार दि. 11 फेब्रुवारी रोजी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद, प्रवक्ते विनय मृत्यूंजय आणि आरसीबीचे प्रतिनिधी राजेश मेनन यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी आपली भेट घेतली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी देण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्यावषी जूनमध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती कुन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन केली होती. न्या. कुन्हा यांनी क्रिकेट स्पर्धेदरम्यान कोणत्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात याबद्दल शिफारसी केल्या होत्या. या शिफारसींचा अभ्यास केल्यानंतर केएससीएला या शिफारसी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी जीबीए आयुक्त आणि शहर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, असे गृहमंत्री परमेश्वर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणे आवश्यक
आता आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहेत. परिणामी,केएससीए आणि आरसीबीने बेंगळूरमध्ये स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे मी बुधवारी उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणते सुरक्षा उपाय केले गेले आहेत. न्या. कुन्हा समितीच्या अहवालातील शिफारशी लागू केल्या आहेत की नाही यावर आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशीही या विषयावर चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे बेंगळूरला आयपीएल सामने आयोजित करण्याची परवानगी देण्याबाबत आम्ही बुधवारी निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
क्रिकेट चाहत्यांची सुरक्षा महत्त्वाची
सरकारसाठी क्रिकेट चाहत्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. चेंगराचेंगरीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून, आम्ही सर्व गोष्टींवर व्यापक चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. बुधवारी होणाऱ्या बैठकीत जीबीए आयुक्त, शहर पोलीस आयुक्त, ऊर्जा विभागासह विविध खात्यांचे प्रमुख आणि उच्च अधिकारी उपस्थित राहतील. आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.