टाटा सन्स चेअरमनपद कार्यकाळ वाढीचा निर्णय लांबणीवर
बेंगळूर :
टाटा सन्सची कार्यकारी मंडळाची बैठक मंगळवार दि. 24 फेब्रुवारी रोजी पार पडली असून त्यामध्ये टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळ वाढीबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
फेब्रुवारी 2027 पासून त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरु होणार आहे. या संदर्भात कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवारी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांच्या पुर्ननियुक्तीबाबत बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीमध्ये टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी टाटा समूहातील काही व्यवसायांना होणाऱ्या नुकसानीबाबतचा मुद्दा त्याचबरोबर त्यासंबंधातील भांडवलाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीमध्ये कंपनीची एकंदर कामगिरी, भांडवली खर्चाचे नियोजन त्याच प्रमाणे कार्यप्रणाली सुधारणा या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. एन. चंद्रशेखरन यांच्या पुर्ननियुक्तीबाबत चर्चेदरम्यान मतभेद निर्माण झाल्याने यासंबंधीचा निर्णय होऊ शकला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चंद्रशेखरन यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह तसेच राहिले आहे.