पेठ सांगली महामार्ग निवाडे पूर्ण
सांगली :
पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे निवाडे पूर्ण झाले आहेत. ७०६ जमीनधारकांना नुकसानभरपाई संदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात तीन गावातील बाधीत शेतकऱ्यांना पाच कोटी ९० लाख १५ हजार भरपाई मिळणार आहे. संबंधितांनी सांगली येथे भुसंपादन क्र.१ उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पुर्तता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग १६६ (एच) अंतर्गत पेठ नाका ते सांगली रस्त्याची लांबी ४१.२५० कि. मी. आहे. आवश्यक भूमी संपादनाचे निवाड्याचे कामकाज उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) यांनी तीन महिन्यापूर्वी पूर्ण केले आहे. एकूण १२ निवाड्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मौजे तुंग, कसबे डिग्रज व उरूणच्या ६ निवाड्यांना मान्यता दिली आहे. त्याचा निधी उपलब्ध झाला आहे. एकूण ७०६ खातेदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे पुढे म्हणाले, भूसंपादनाच्या निवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यात तुंग, कसबे डिग्रज आणि उरूण अशा तीन बाधित गावांतील एकूण ४७ गट आहेत. ०.४५३५१ हेक्टर आर क्षेत्र आहे. नोटिसांची संख्या ७०६ असून एकूण रक्कम ५ कोटी ९० लाख १५ हजार ५९० रूपये आहे. या अनुषंगाने संबंधित जमीनधारकांस मोबदला देण्याच्या दृष्टीने तहसीलदार, तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे पुढे म्हणाले, मौजे पेठ, इस्लामपूर, उरूणचे उर्वरित गट यांचे नुकसान भरपाईचे निवाडे मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठवण्यात आले आहेत. मान्यता प्राप्त होताच संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही होणार आहे.
- गावनिहाय क्षेत्र
तुंग गावातील एकूण ४ गट असून एकूण ०.००६० हेक्टर आर क्षेत्र आहे. नोटिशींची संख्या २० असून एकूण रक्कम १ लाख ७० हजार ४९ रूपये आहे. कसबे डिग्रज गावातील एकूण ३९ गट असून एकूण ०.३७५५१ हेक्टर आर क्षेत्र आहे. नोटिशींची संख्या ६३८ असून एकूण रक्कम ५ कोटी ७५ लाख ५४ हजार ६९८ रूपये इतकी आहे. उरूण गावातील एकूण ४ गट असून एकूण ०.०७२० हेक्टर आर क्षेत्र आहे. नोटिशींची संख्या ४८ असून एकूण रक्कम १ लाख, २९ हजार ८४३ रूपये इतकी आहे