For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ता नूतनीकरणासाठी 1 डिसेंबरची डेडलाईन

11:11 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्ता नूतनीकरणासाठी 1 डिसेंबरची डेडलाईन
Advertisement

ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे : म. ए. समितीच्या रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

वार्ताहर/उचगाव

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव-बाची पट्ट्यातील 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरण करा, या मागणीसाठी बेळगाव तालुका म. ए. समितीने सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी बेळगुंदी फाट्यावर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन छेडले. आणि पुन्हा एकदा समितीची, मराठी माणसाची ताकद शासनाला दाखवून दिली. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र आंदोलनकर्त्यांनी ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे ठासून सांगितले. यावर अखेर एक डिसेंबर ही अखेरची डेडलाईन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Advertisement

सोमवारी सकाळी बेळगुंदी फाट्यावर बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, सचिव एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर, सहसचिव मनोहर संताजी, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर, जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील व तालुक्यातील अनेक नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. या भागातील अनेक ग्रामपंचायत तसेच गावांतील ग्रामस्थ, प्रवासी, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांनी या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सहभाग दर्शविला होता. परिणामी रास्ता रोको लक्षवेधी ठरला होता.

घोषणांनी परिसर दणाणला

आंदोलनप्रसंगी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांसह रस्ता दुरुस्तीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निषेधार्थ घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार मांडताना म्हणाले, जनतेने सातत्याने गेली 22 वर्षे मागणी करूनदेखील बेळगावपासून बाचीपर्यंतच्या रस्त्याची अद्याप दुरुस्ती झाली नाही. रस्त्याची दुर्दशा वाढत चालली आहे. रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने व शासनाने रस्ता दुऊस्तीच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

रायचूर ते बेळगाव रस्त्याप्रमाणे नूतनीकरण करा

आमची मागणी ही या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची आहे. दुरुस्ती करण्याची नाही. नूतनीकरण ऐवजी रस्त्याच्या दुरुस्तीवर आम्ही समाधान मानायचे का, तसेच रस्त्याची सध्या करण्यात आलेली दुरुस्तीदेखील वरवरची तात्पुरती आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र या रस्त्यावरून हजारो प्रवाशांची रोजची वाहतूक पाहता सदर खड्ड्यांतून टाकलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरलेली आहे. यासाठी आमची एकच मागणी आहे. ज्याप्रमाणे रायचूर ते बेळगाव रस्ता करण्यात आला आहे. त्याप्रमाणे बेळगाव बाचीपर्यंतचा रस्तादेखील करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणातून हे मुद्दे मांडले.

पश्चिम भागातील सर्व रस्ते दुरुस्त करावेत

यावेळी आमदार मनोहर किणेकर यांनी फक्त बेळगाव ते बाची रस्ता नव्हे तर वाघवडे ते मच्छे, बडस ते बाकनूर तसेच बेळगाव तालुक्यातील इतर खराब झालेले रस्तेदेखील दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने छेडलेल्या सुमारे दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे बेळगुंदी क्रॉस ते बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाला होता. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले. या आंदोलनप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. त्यामुळे हे आंदोलन शांततेत पार पडले.

15 कोटीचे 9 कोटी होण्यामागे गौडबंगाल काय?

रायचूर ते बाची हा महामार्ग असताना 2002 साली रायचूर ते बेळगावपर्यंतच्या रस्त्याचा विकास केला गेला. यापुढे बेळगाव ते बाचीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाकडे गेली 22 वर्षे झाली लक्ष देण्यात आले नाही. या रस्त्याची देखील रायचूर ते बेळगावपर्यंतच्या रस्त्याप्रमाणे नूतनीकरण करावे, अशी मागणी अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे प्रसिद्धीस दिले होते. मात्र आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नऊ कोटी ऊपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत. मग जनतेने कोणावर विश्वास ठेवावा? किंवा नेमके हे काय गौडबंगाल आहे. की जाणूनबुजून मराठी माणसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचेच हे प्रकार आहेत का? असाही अनेकांनी यावेळी संतापजनक प्रश्न उपस्थित केला.

Advertisement
Tags :

.