कर्जधारकांना दिलासा मिळणार?
रेपो दरात रिझर्व्ह बँकेकडून होऊ शकते कपात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आगामी द्विमासिक पतधोरण निश्चित करताना रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्का कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जधारकांच्या मासिक हप्त्यांची रक्कम काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकतो. दर कपातीचा निर्णय बँकेच्या डिसेंबरमधील बैठकीत होण्याची शक्यता आहे. गेल्या 10 बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये कोणतेही परिवर्तन केलेले नाही. महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो आणि इतर व्याजदरांसंबंधी बँकेने सावध पवित्रा घेतलेला आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महागाई दर सध्याच्या 5.4 टक्क्यांवरुन घटून 4.9 टक्क्यांच्या पातळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला रेपो दरात कपात करण्याची संधी मिळणार आहे.
पुढच्या अहवालावर अवलंबून
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला देशाच्या स्थूल राष्ट्रीय विकासदरासंबंधीचा अहवाल प्राप्त होणार आहे. हा अहवाल सकारात्मक असेल तर व्याजदरात कपात करण्याचे पाऊल बँक उचलू शकणार आहे. अमेरिकेच्या संघराज्यीय बँकेनेही गेल्या महिन्यात व्याजदरात कपात केली होती. त्यामुळे इतर देशांच्या बँकांनीही कमी अधिक प्रमाणात व्याजदर कपात केली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकही हाच आकृतीबंध आचरणात आणेल अशी शक्यता अर्थतज्ञांना वाटत आहे.
काही तज्ञांचे भिन्न मत
भारताचा विकास दर अन्य देशांच्या तुलनेत अधिक असला तरी भारताची अर्थव्यवस्था अन्य देशांपेक्षा अधिक भक्कम आहे असा याचा अर्थ होत नाही. भारतात महागाई दर, विशेषत: जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर अधिक आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक इतक्यातच व्याजदर कपात करुन वित्तबाजारात अधिक पैसा सोडण्याची शक्यता कमी आहे, असे मत इतर काही अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व्याजदर कपात होणार की नाही, हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसच समजणार आहे.