किश्तवाड ढगफुटीतील मृतांचा आकडा 60 वर
बेपत्ता लोकांमुळे मृतांची संख्या वाढणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरुवारी ढगफुटी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरे, दुकाने आणि वाहने पुराच्या विळख्यात सापडल्यामुळे वाहून गेली आहेत. तसेच मोठी जीवितहानीही झाली आहे. शनिवारपर्यंत 60 जणांचे मृतदेह सापडले असून हा आकडा आणखीही वाढणार आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा आकडा मोठा असून त्यांचा शोध घेण्याचे कामही आव्हानात्मक आहे. बहुतेक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटली आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मते, या आपत्तीत 60 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 ते 70 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बऱ्याच भागातील लोक अजूनही मोठ्या संख्येने बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम तीव्र करण्यात आले आहे. एसडीआरएफ शुक्रवारपासून या मोहिमेत गुंतले आहे. तसेच आता दिल्लीहून दाखल झालेली एनडीआरएफची टीमही शोधमोहिमेत उतरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शनिवारी पुन्हा एकदा संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी या घटनेबाबत सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यापूर्वी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांनीही या आपत्तीविषयीची चौकशी केली होती. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या सर्वांनी बेपत्ता लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यावर भर दिला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी किश्तवाड जिह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देत अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.