For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nira River | नीरा नदीत मृत्यूचे तांडव! केमिकलयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत; फलटण तालुक्यात खळबळ

04:46 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
nira river    नीरा नदीत मृत्यूचे तांडव  केमिकलयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत  फलटण तालुक्यात खळबळ
Advertisement

.                                              नीरा नदीकाठचे जनजीवन धोक्यात!

Advertisement

फलटण : गेल्या अनेक वर्षापासून नीरा नदीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नुकतेच फलटण तालुक्यात नीरा नदीच्या पात्रात मृत मासे मोठ्या प्रमाणात तरंगताना आढळून आले आहेत. त्याच बरोबर या परिसरातील काही विहरीमधील पाण्यावर केमिकलचा तवंग पसरल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत केमिकल मिश्रित पाण्यामुळे जलसृष्टी, पशुधन, शेती व मानवी जीवन धोक्यात आले असूनही वर्षानुवर्षे त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तेथील अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांना हरताळ फासणाऱ्या व या प्रदूषणाबाबत 'ढिम्म असणाऱ्या प्रदूषण मंडळाच्या संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवरच सरकारने आता कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी व्यक्त होत आहे.

सातारा व पुणे जिल्ह्याचा हद्दीवरून नीरा नदी वाहते. या नदी पात्रात सोडण्यात येत असलेल्या केमिकलयुक्तपाण्यामुळे नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. या प्रदूषित पाण्याचा फटका गेली अनेक वर्षे नीरा नदीकाठच्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. या गंभीर प्रश्नावर वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आंदोलनेही करण्यात आली आहेत, परंतु प्रदूषण महामंडळमात्र याप्रकरणी आश्वासक कारवाई करण्याबाबत असफल ठरल्याचे बोलले जात आहे. फलटण तालुक्यात नीरा नदीच्या पात्रात केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने या दूषित पाण्यावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर नदीत अनेक ठिकाणी नदी खोलीकरण व स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना आणि कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी, नियंत्रणाचा अभाव आणि प्रदूषण करण्मयांवर कारवाईचा अभाव यामुळे नद्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे केवळ योजना नव्हे तर कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक बनले आहे.

Advertisement

पाणी काळसर, फेसाळ आणि तीव्र दुर्गंधीयुक्त झालेले दिसून येत आहे. पाण्याचा रंग बदलला असून पाण्यात विषारी घटक मिसळल्यामुळे जलचर जीवसृष्टीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर हे दूषित पाणी पशुधनासाठी वापरले जात असल्याने पशुधनही धोक्यात आले आहे, याच पाण्याचा वापर शेतकरी शेतीसाठी करीत असल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पन्न व जमिनीचा पोत यावरही होत आहे. या दूषित पाण्याचा फटका आता नदीकाठच्या विहिरींनाही बसू लागला आहे. अनेक विहिरींमध्ये पाण्यावर केमिकलचा बर दिसत असून हे पाणी पिण्यास व शेतीसाठी वापरणे धोकादायक बनले.

कठोर पावले गरजेची नीरा नदी ही फलटण तालुक्यासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. या नदीवर अनेक गावांचा पाणीपुरवठा व शेती अवलंबून आहे. त्यामुळे नदीत अशा प्रकारचे प्रदूषण सुरू राहिल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, आरोग्य समस्या तसेच शेती उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.