For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनायक जाधव यांच्या निधनाने हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपले

10:48 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विनायक जाधव यांच्या निधनाने हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपले
Advertisement

विविध संघटनांनी वाहिली श्रद्धांजली

Advertisement

बेळगाव : बेळगावमधील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य यासह सर्वच क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक जाधव. आरोग्याची समस्या असतानाही आपले काम चोख कसे बजावायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. व्यासपीठावर आले की त्यांना एक स्फूर्ती मिळत होती. विनायक जाधव यांच्या जाण्याने बेळगावमधील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपल्याचा शोक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी व्यक्त केला. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे समन्वयक विनायक जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी लोकमान्य रंगमंदिर येथे शोकसभा पार पडली. यावेळी बेळगावमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, पंढरी परब, गजानन धामणेकर, डी. पी. वागळे, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, सीईओ अभिजीत दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले यांच्या हस्ते विनायक जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांनी विनायक जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. विनायक म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा होता. कोणतेही काम नाही न म्हणता ते कसे पूर्ण करायचे ही कसब त्यांच्याकडे होती. कमी वयात माणसे कमविल्यामुळेच विनायकचा मोठा संपर्क तयार झाला होता. आपल्या वेदना कधीही चेहऱ्यावर न आणता कायम हसतमुख राहणारा विनायक गेल्याने समाजाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

विनायक यांचे मित्र चेतन बागी व मिलिंद भातकांडे यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी विनायक यांनी गायिलेले एक गाणेही ऐकविण्यात आले. नेतृत्व, व्यवस्थापन व जनसंपर्क ही विनायक जाधव यांची खासियत होती, अशा शब्दात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी श्रद्धांजली वाहिली. मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार म्हणाले, विनायक यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. एक जीवाभावाचा मित्र गमावल्याचा शोक त्यांनी व्यक्त केला. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी विनायक जाधव यांनी कशाप्रकारे संघर्षाच्या काळातही मदत केली, याची माहिती दिली. चंदगडी नाट्या महोत्सवालाही विनायक जाधव यांनी मदत केल्याचे परसू गावडे यांनी सांगितले. सीईओ अभिजित दीक्षित यांनी लोकमान्य सोसायटीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहापूर विभाग गणेशोत्सव व शिवजयंती महामंडळाच्यावतीने नेताजी जाधव यांनी श्रद्धांजली वाहून बेळगावमधील गणेशोत्सव व शिवजयंतीला विनायक जाधवांच्या प्रयत्नांतून विधायक रूप देण्यासाठी कसा प्रयत्न केला गेला, याची माहिती दिली. हिरकणी हायकर्स, शनैश्चर एज्युकेशनल अँड वेल्फेअर ट्रस्ट, तरुण भारत ट्रस्ट संचालित ज्ञान प्रबोधन मंदिर, रसिकरंजन बेळगाव, मराठी भाषा प्रेमी मंडळ, अखिल भारतीय बृहन्महाराष्ट्र मंडळ, गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम टीम, वरेरकर नाट्या संघ, लोकमान्य ग्रंथालय यांच्यावतीने विनायक जाधव यांना अनिल चौधरी यांनी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र एकीकरण समिती व श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रमाकांत कोंडुस्कर, सार्वजनिक वाचनालय, पायोनिअर बँक व आदर्शनगर रहिवाशांकडून अनंत लाड, मराठा मंदिरच्यावतीने शिवाजी हंगिरगेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व विनायक जाधव यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

Advertisement

किरण ठाकुर यांचा शोकसंदेश

लोकमान्य परिवाराने एक सिंह गमावला. आयुष्यभर विनायक यांनी इतरांसाठी अथक परिश्रम केले. हसतमुख, प्रेमळ व मोहक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी माणसांना एकत्रित बांधून ठेवले, अशा शब्दात लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांचा शोकसंदेश वाचून दाखविण्यात आला.

Advertisement
Tags :

.