चुकीच्या उपचाराने ऊस तोडणी मजुराचा मृत्यू?
बैलहोंगल तालुक्यातील घटना : डॉक्टरविरुद्ध एफआयआर
बेळगाव : ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातून बैलहोंगल तालुक्यात आलेल्या एका तरुणाचा चुकीच्या उपचाराने मृत्यू झाला आहे. बैलहोंगल तालुक्यातील पट्टीहाळ के. बी. येथे ही घटना घडली असून दोडवाड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन अशोक लवांडे (वय 19, रा. फत्तेपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर-अहमदनगर) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सुदर्शन आपल्या इतर सहकाऱ्यांसह ऊस तोडणीसाठी पट्टीहाळ के. बी. येथे आला होता. गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने तो उपचारासाठी पट्टीहाळ के. बी. येथील एका डॉक्टरकडे पोहोचला.
स्थानिक डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर सुदर्शन आपल्या तळावर गेला. ज्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात आले होते. तेथे दुसऱ्या दिवशी सूज आली. त्यामुळे तो पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला गोळ्या लिहून दिल्या. तरीही त्याला बरे वाटले नाही. त्याने आपल्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. लगेच शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी त्याला बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. रात्री त्याचा मृत्यू झाला. रविवारी कुटुंबीयांनी पट्टीहाळ के. बी. येथील डॉ. शिवानंद यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. चुकीच्या उपचाराने सुदर्शनचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोडवाड पोलीस पुढील तपास करीत आहेत. सुदर्शनच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.