आयएसआय हस्तक रोडेचा पाकिस्तानात मृत्यू
खलिस्तान लिबरेशन फोर्सचा होता प्रमुख : जरनैल सिंह भिंद्रनवालेचा होता पुतण्या
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
प्रतिबंधित संघटना खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख लखबीर सिंह रोडेचा पाकिस्तानचा मृत्यू झाला आहे. भारतविरोधी कारवायांसाठी अनेक वर्षांपर्यंत पाकिस्तानसाठी महत्त्वाचा हस्तक राहिलेला खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंह रोडेचे मृत्यसमयी वय 72 वर्षे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारत सरकारने लखबीर सिंह रोडेला युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. विशेष म्हणजे जरनैल सिंह भिंद्रनवालेचा तो पुतण्या होता आणि अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहत होता.
लखबीर सिंहचा बंधू आणि अकाल-तख्तचा माजी जत्थेदार जसबीर सिंह रोडेने त्याच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. लखबीर सिंहवर सोमवारी पाकिस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रोडे हा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत मिळून भारतातील पंजाबमध्ये शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असायचा. पंजाबमध्ये टिफिन बॉम्ब मॉड्यूलद्वारे त्याने स्फोटांचे कट रचले होते. रोडे हा 2021 च्या लुधियाना न्यायालय विस्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. रोडेच्या पुतण्याला आरडीएक्स आणि टिफिन बॉम्बप्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक केली होती.
अलिकडेच भूखंड जप्त
मोहालीत एनआयएच्या विशेष न्यायालयाने पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडेच्या नावावर असलेला भूखंड जप्त करण्याचा आदेश दिला होता. हा भूखंड मोगा जिल्ह्यातील बाघापुराना तालुक्यात कोठे गुरुपुरा गावात आहे. न्यायालयाने युएपीएच्या कलम 33 (5) अंतर्गत भूखंड जप्त करण्याचा आदेश दिला होता.
या कलमाच्या अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील गुन्हेगारांची संपत्ती जप्त करता येते. टिफिन बॉम्ब विस्फोटाशी निगडित प्रकरणी जलालाबाद पोलीस स्थानकात 16 डिसेंबर 2021 रोजी एफआयआर नोंदविण्यात आला होता.
पाकिस्तानात पलायन
लखबीर सिंह रोडे हा मूळचा मोगा जिल्ह्यातील रोडे गावचा रहिवासी होता. त्याच्या नावासोबत रोडे हा शब्द गावामुळेच जोडला गेला होता. रोडे हा जरनैल सिंह भिंद्रनवालेचा पुतण्या होता. भिंद्रनवाले हा 70 आणि 80 च्या दशकात खलिस्तानी हिंसेचा मुख्य सूत्रधार होता. रोडे देखील अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता. याचमुळे त्याने भारतातून दुबईत पलायन करत तेथून पाकिस्तान गाठले होते.
भारताचा आणखी एक शत्रू मृत्यूपंथाला
मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार साजिद मीर गंभीर
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांची अलिकडच्या काळात झालेल्या हत्यांविषयी अनेक प्रकारचे दावे होत असताना पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी मृत्यूपंथाला आहे. जागतिक दहशतवादी आणि 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यांचा प्रमुख सूत्रधार साजिद मीर सध्या रुग्णालयात दाखल आहे. लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरवर विषप्रयोग झाल्याची चर्चा आहे. साजिद मीर हा पाकिस्तानातील डेरा गाजी खानच्या तुरुंगात होता, तेथेच कथित स्वरुपात त्याला अन्नातून विष देण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्यावर मीरला तुरुंगातून एअरलिफ्ट करत बहावलपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. साजिद मीरच्या जीवाला धोका असल्यानेच त्याला लाहोर तुरुंगातून डेरा गाझी खान तुरुंगात हलविण्यात आले होते हे विशेष.पाकिस्तानातील न्यायालयाने त्याला दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी 8 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मुंबईवरील हल्ल्यानंतर साजिद मीरने स्वत:चा चेहरा बदलून घेतला होता. एफबीआयनुसार दहशतवादी साजिदने स्वत:चे नावही अनेकदा बदलले होते.