उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू , अपघात की खून ? खुनाच्या चर्चेने जत हादरले : उलट सुलट चर्चा
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे यांचा मंगळवारी रात्री मोटर सायकलवरून घराकडे जाताना मृत्यू झाला. ही घटना रात्री उशिरा उघडकीस येताच, सदस्य अमर कांबळे यांचा खूनच झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परंतु जत पोलिसात मात्र या घटनेविषयी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एकीकडे गावपातळीवर खुनाची चर्चा असतानाच पोलीसांत मात्र मयताच्या नातेवाईकांकडून कसलीही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे हा अपघाती मृत्यू की खून याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे मात्र जतमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू आहे.
अधिक माहिती अशी, उमराणी येथील अमर कांबळे हे ग्रामपंचयातीचे विद्यामान सदस्य आहेत. पूर्वी ते गवंडी काम करत होते. अलिकडे त्यांनी उसतोड मुकादम म्हणून काम सुरू केले होते. उमराणी गाव कर्नाटक सीमेवरच आहे. कर्नाटकातील रामतीर्थ येथील कांहीजणांच्या उसतोड उचलीतून त्यांचा वाद सुरू असल्याची चर्चा उमराणी भागात होती. यातूनच वाद झाल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, मंगळवारी देखील याच कारणातून वाद झाल्याचे समजत आहे. त्यानंतर रात्री उशिरा अमर कांबळे व अन्य एकजण आपल्या घराकडे जात असताना रस्त्यात गाडीवरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली. त्यानंतर हा अपघात किंवा आकस्मिक मृत्यू नसून, खून झाल्याची आवई मोठ्या प्रमाणात उठली होती. कांबळे यांचा जागीच मत्=यू झाल्याने त्यांना रात्रीच जतच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बुधवारी दिवसभर जत पोलिसांत या मत्=यू विषयी कसलीही तक्रार दाखल झालेली नाही. शिवाय पोलिसांनी देखील हा खून नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या घटनेचा तपास मात्र पोलीस मुळाशी जावून करत आहेत.
तालुका हादरला, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उमराणी येथील अमर कांबळे यांचा खून की अन्य कारण हे तपासात पुढे येईल. परंतु गेल्या आठ दिवसात दिवसाढवळ्या दोन खून झाले. शिवाय अलिकडे शहरात व गावागावात टोळीयुध्द, अवैध धंदे, गांजा, बनावट शिंदी यासारख्या नशिली पदार्थामुळे जीवघेणे हल्ले होत आहेत. जत शहरासह हददीत लोकांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे जत शहर हादरले असून, पोलिसांनी आता खाकीचा धाक दाखवत कायदा सुव्यवस्थेबददल जनमानसात निर्माण झालेली प्रतिमा सुधारण्याची गरज आहे.