डीयूचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांचे निधन
हृदयविकाराच्या झटक्यानंतर घेतला अखेरचा श्वास : पित्ताशयाचा संसर्ग, मूत्रपिंड निकामी झाल्याचेही स्पष्ट
वृत्तसंस्था/ हैदराबाद
डीयूचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा (57) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांना पित्ताशयाचा संसर्ग झाला होता. त्यावरील उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. हैदराबादस्थित ‘निम्स’मधील डॉक्टरांनी त्यांना रात्री 8:36 वाजता मृत घोषित केल्याची माहिती साईबाबांचे भाऊ रामदेव यांनी दिली. नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे 10 वर्षे तुऊंगात घालवल्यानंतर मार्च 2024 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
जी. एन. साईबाबा एकाच वेळी अनेक आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर 5 दिवसांपूर्वी त्यांच्यावर ‘निम्स’ येथे पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. पण अचानक त्याच्या पित्ताशयात संसर्ग निर्माण होऊ लागला. तसेच ताप आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तसेच रक्तदाब पातळीही घसरली. किडनीनेही काम करणे बंद केले. याचदरम्यान शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2014 मध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून जी. एन. साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या गडचिरोली न्यायालयाने मार्च 2017 मध्ये त्यांना दोषी ठरवले होते. 5 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा आणि अन्य 5 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाने त्यांची जन्मठेप रद्द केली होती. तसेच दोषमुक्त होण्यासाठी त्यांना अपील करण्याची परवानगीही देण्यात आली होती.