For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषारी पाणी पिल्यामुळे गायी-बकऱ्यांचा मृत्यू

09:46 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
विषारी पाणी पिल्यामुळे गायी बकऱ्यांचा मृत्यू
Advertisement

संतिबस्तवाड परिसरात हळहळ : शेतकऱ्याचे सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान, अन्य कांही जनावरांवर उपचार सुरू

Advertisement

वार्ताहर  /किणये

विषारी पाणी पिल्यामुळे संतिबस्तवाड येथील दोन गायी व चार बकऱ्यांचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास संतिबस्तवाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शिवारात घडली. शेतकऱ्याची बकरी व गायी मृत्युमुखी पडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे. संतिबस्तवाड गावातील यल्लाप्पा परशराम चनीकोप यांनी आपली जनावरे व बकरी रोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी चरण्यासाठी सोडली होती. संतिबस्तवाड रस्त्याच्या  बाजूला एका शिवारात पाण्याचा बॅरेल ठेवण्यात आला होता. कडक उन्हामुळे साहजिकच त्या जनावरांना तहान लागली असणार. यामुळे त्या जनावरांनी त्या बॅरेलमधील पाणी पिले हेते. मात्र सदर बॅरेलमधील पाणी हे विषारी होते. हे पाणी पिल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात दोन गायी व चार बकरी मृत्युमुखी पडल्या. हा प्रकार पाहून यल्लाप्पा चनीकोप या शेतकऱ्याने एकच आक्रोश केला. आजूबाजूला जाणारे नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.

Advertisement

त्या बॅरेलमधील विषारी पाणी अन्य म्हशी, गायी व बकऱ्यांनी पिलेले आहे. यामुळे सध्या अकरा जनावरे व बकऱ्यांवरती उपचार सुरू आहेत. यल्लाप्पा यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी गायी-म्हशी व बकरी पाळलेली आहेत. बकरी विकून व गायी-म्हशीचे दूध विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावरती त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. मात्र अचानक विषारी पाणी पिल्यामुळे दोन गायी व चार बकरी मृत्युमुखी पडली तर अन्य जनावरे बेशुद्ध अवस्थेत आहेत. यामुळे सदर शेतकरी हतबल झालेला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही घटनास्थळी एकच आक्रोश केला होता. संतिबस्तवाड पशु चिकित्सालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी त्यांच्या इतर बकरी व जनावरांवर उपचार केले आहे. ज्या बकऱ्यांनी व जनावरांनी पाणी पिले आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टर तेली यांनी दिली. त्या बॅरेलमध्ये शेत शिवारात पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी पाण्यामध्ये औषध मिसळून ठेवण्यात आले होते. असे घटनास्थळी बोलले जात आहे आणि तेच विषारी पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.