खासगी इस्पितळात गर्भवतीचा मृत्यू
नातेवाईकांचा खडेबाजार पोलीस ठाण्यात ठिय्या, गर्भपातानंतर प्रकृतीत बिघाड
बेळगाव : उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी गोंधळी गल्ली येथील एका खासगी इस्पितळात ही घटना घडली असून डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरती अनिल चव्हाण (वय 30) रा. सागरनगर, कंग्राळी खुर्द असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. हे कुटुंबीय मूळचे कामशेत, ता. मावळ, जि. पुणे येथील असून सध्या सागरनगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. आरती सहा महिन्यांची गर्भवती होती. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
अनिल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील खडेबाजार पोलीस स्थानकात खासगी इस्पितळ प्रशासनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुधवारी शवचिकित्सा करून आरतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच कुटुंबीयांची खडेबाजार पोलीस स्थानकासमोर गर्दी जमली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 7 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी आरती व कुटुंबीय गोंधळी गल्ली येथील खासगी इस्पितळात पोहोचले होते. तपासणीनंतर गर्भाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्या पुन्हा दाखल झाल्या. त्यांचा गर्भपात झाला. दुपारपर्यंत प्रकृती ठीक होती. दुपारनंतर पुन्हा प्रकृती अस्वस्थ झाली. सायंकाळी तिचा मृत्यू झाला. प्रकृती खालावताच पुढील उपचारासाठी तिला अन्य इस्पितळात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तेथे पोहोचण्याआधीच आरतीचा मृत्यू झाला होता. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मुलांचा आक्रोश हृदय पिळवटणारा
गर्भपातानंतर डॉक्टरांनी तो गर्भ दफन करण्यास सांगितले. त्यानुसार तो दफन करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आरतीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच यासंबंधीची अधिक माहिती हाती येणार आहे. पोलीस स्थानकाबाहेर आरतीचा दहा वर्षांचा मुलगा व पाच वर्षाच्या मुलीचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता.