For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये ज्युनियर डॉक्टरांचे आमरण उपोषण

06:51 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये ज्युनियर डॉक्टरांचे आमरण उपोषण
Advertisement

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : आरोग्य सचिवाला हटविण्यासमवेत 9 मागण्यांवर ठाम

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या कोलकात्यात 8 ऑगस्ट रोजी रात्री प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात 6 ज्युनियर डॉक्टरांनी उपोषण सुरू केले आहे. ज्युनियर डॉक्टरांनी आरोग्य सचिव एन. एस. निगम यांना पदावरून हटविणे, आरोग्य विभागातील भ्रष्टाचारासाठी उत्तरदायित्व निश्चित करण्यासमवेत स्वत:च्या 9 मागण्यांवर ठाम राहत हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

कोलकाता पोलिसांकडून लाठीमारानंतर शुक्रवारी धर्मतला भागात निदर्शने सुरू केली होती. मागण्या मान्य करण्यासाठी या डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. राज्य सरकारला देण्यात आलेली मुदत शनिवारी रात्री 8.30 वाजता पूर्ण झाली. यानंतर पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर फ्रंटच्या 6 प्रतिनिधींनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी मंचावर सीसीटीव्ही लावणार असल्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे.

बंगालच्या ज्युनियर डॉक्टरांनी बलात्कार-हत्या प्रकरणाच्या विरोधात 10 ऑगस्टपासून 21 सप्टेंबरपर्यंत संप केला होता. डॉक्टरांनी यापूर्वी राज्य सरकारसमोर 5 मागण्या मांडल्या होत्या. सरकारने यातील 3 मागण्या मान्य केल्या होत्या. तसेच दोन अन्य मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर डॉक्टर रुग्णालयांमध्ये कामावर परतले होते. परंतु 27 सप्टेंबर रोजी सागोर दत्ता रुग्णालयात 3 डॉक्टर्स आणि 3 नर्सेसना मारहाण झाल्यावर नाराज होत डॉक्टरांनी पुन्हा संप सुरू केला होता.

राज्य सरकार जबाबदार ठरणार

आम्ही सरकारला 24 तासांची मुदत दिली होती. परंतु आम्हाला केवळ धमक्याच प्राप्त झाल्या. आम्हाला उत्सवात परतण्यास सांगण्यात येत आहे, परंतु आम्ही त्या मानसिकतेत नाही असे डॉक्टरांच्या संघटनेकडून म्हटले गेले आहे.  डॉक्टरांनुसार पहिल्या टप्प्यात 6 ज्युनियर डॉक्टर उपोषण करतील. तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास हे उपोषण अनिश्चित काळासाठी सुरू राहणार आहे. अशास्थितीत कुठल्याही डॉक्टरच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

ममता सरकार गंभीर नाही

डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी पूर्ण करण्यासाठी ममता सरकारची भूमिका सकारात्मक नाही. आमच्यावर अजून हल्ले होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. आमच्याकडे पूर्णपणे काम बंद करण्याशिवाय कुठलाच पर्याय नसल्याचे ज्युनियर डॉक्टर्सनी म्हटले आहे.

संदीप घोषच्या 10 सहकाऱ्यांवर कारवाई

आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तेथील 10 डॉक्टरांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात इंटर्न, हाउस स्टाफ आणि सिनियर रेजिडेंट सामील आहेत. हे सर्वजण आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. घोष यांच्याविरोधात सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. यात ज्युनियर डॉक्टरवरील बलात्कार तसेच हत्या प्रकरण आणि आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण सामील आहे.

तर निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टर अन् अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास करणे, वसतिगृहातून हकालपट्टी करण्याची धमकी देणे, लैंगिक शोषण आणि गैरवर्तन, खंडणीवसुली, विद्यार्थ्यांच्या विरोधात खोटे एफआयआर दाखल करण्याचा आरोप यात सामील आहे.

Advertisement
Tags :

.