For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | मध्यस्थी केल्याचा राग अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला; अक्कलकोटमध्ये खळबळ

05:43 PM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   मध्यस्थी केल्याचा राग अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला  अक्कलकोटमध्ये खळबळ
Advertisement

अक्कलकोट -येथील शहरातील दोन व्यक्तींमधील भांडण सोडवून मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अक्कलकोट शहरातील माणिक पेठ परिसरात घडली. हल्ल्यात युवकाच्या मानेच्या दिशेने कोयत्याचा वार करण्यात आला. त्याने प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने कोयत्याचा घाव त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. दरम्यान, युवकाच्या वृद्ध आजीवरही हॉकी स्टिकने मारहाणकेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Advertisement

या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सुनील खवळे (वय ५४), श्रेयश संतोष खवळे (२७), नागेश अशोक ढोबळे (३७), श्रीपाद सुनील खवळे (२३), गणेश संतोष खवळे (२२), संतोष खवळे (४०) व पियुष खवळे (३३, सर्व रा. माणिक पेठ, अक्कलकोट) अशा सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे यासह विविध कलमांन्वये गुन्डा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुनील खवळे आणि गणेश संतोष खवळे या दोघांना अटक केली असून, अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

फिर्यादी किसन धोंडीबा जाधव (वय ५४, रा. माणिक पेठ, अक्कलकोट) यांचा मुलगा नागेश जाधव याने काही दिवसांपूर्वी मायाजी कांबळे आणि आरोपी नागेश ढोबळे यांच्यात सुरू असलेले भांडण मध्यस्थी करून सोडवले होते. याच कारणावरून आरोपींच्या मनात नागेशविषयी राग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यातआले आहे.

Advertisement

२७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास नागेश ढोबळे हा हातात लोखंडी कोयता घेऊन जाधव यांच्या घरासमोरून फिरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी 'घरासमोर कोयता घेऊन का फिरत आहेस?' असा सवाल केल्याच्या कारणावरून वाद वाढला.
त्यानंतर सुनील खवळे, श्रेयश खवळे, नागेश ढोबळे, श्रीपाद खवळे, गणेश खवळे, संतोष खवळे व पियुष खवळे यांनी एकत्र येत नागेश जाधव याला घेरल्याचा आरोप आहे. यावेळी सुनील खवळे याने हातातील लोखंडी कोयत्याने नागेशच्या मानेच्या दिशेने वार केला. नागेशने प्रसंगावधान राखून वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता कोयत्याचा घाव त्याच्या उजव्या खांद्यावर लागला. दरम्यान, नागेशच्या वृद्ध आजीवरही हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.

Advertisement
Tags :

.