मालमत्ता करसवलतीसाठी जुलै अखेरपर्यंत मुदत
राज्य सेवा प्राधिकरणाच्या सूचनेवरून नगरविकास खात्याचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या (केएसएलएसए) सूचनेनुसार राज्य सरकारने मालमत्ता करात 5 टक्के सवलत देण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली आहे. राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 202425 या वषातील मालमत्ता कर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत पूर्ण प्रमाणात भरल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. यावेळी ही मुदत जुलैअखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्यासाठी एप्रिल महिन्यात देण्यात आलेली 5 टक्के सवलतीची मुदत वाढविण्याचा आदेश नगरविकास खात्याने जारी केला आहे. कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या विनंतीवरून सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव एम. एल. रघुनाथ यांनी 4 जून रोजी सरकारच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले होते.
सरकारच्या आदेशात, ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही ते 31 जुलैपर्यंत संपूर्ण रक्कम भरून 5 टक्के सवलत मिळवू शकतात. 13 जुलै रोजी राज्य कायदा सेवा प्राधिकरणातर्फे राज्यव्यापी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो खटले निकाली निघतात. राज्यात मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे.