‘गृहज्योती’च्या पडताळणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
योजनेतील लाभार्थ्यांची माहिती सेवा सिंधूवर नोंदविणार
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : राज्य सरकारच्या गृहज्योती योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांची अतिरिक्त माहिती संकलित करून ती सेवा सिंधू सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्याच्या प्रक्रियेसाठी राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात ऊर्जा खात्याने आदेश जारी केला असून, सर्व पडताळणी प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आता वीज वितरण कंपन्यांच्या विनंतीनुसार सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे.
या मोहिमेंतर्गत वीज वितरण कंपन्यांचे मीटर रिडर आणि अन्य कर्मचारी गृहज्योती योजनेत नोंदणी केलेल्या घरांना भेट देणार आहेत. यावेळी घरमालक किंवा भाडेकरूंकडून आवश्यक अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे संकलित केली जाणार आहेत. संकलित केलेली माहिती सेवा सिंधू सॉफ्टवेअरमध्ये नोंदवून लाभार्थ्यांच्या तपशिलांची पडताळणी केली जाणार आहे. गृहज्योती योजनेचा लाभ पात्र आणि संबंधित लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचत असल्याची खात्री करणे, हा या पडताळणी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेत नोंदणी केलेल्या काही घरमालकांचा किंवा भाडेकरूंचा मृत्यू झाल्याची, भाडेकरूंनी घर बदलल्याची तसेच घरांची खरेदी-विक्री झाल्यानंतरही संबंधित कागदपत्रे अद्ययावत न केल्याची प्रकरणे सरकारच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करून योजनेच्या अंमलबजावणीत अचूकता आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.