For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साकोर्डातील रानात आढळला मृत पट्टेरी वाघ

06:24 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
साकोर्डातील रानात  आढळला मृत पट्टेरी वाघ
Advertisement

नखे व दात गायब : मृत्यूमागील कारण अस्पष्ट : वनखात्याच्या उदासिनतेवर प्रश्न उपस्थित

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

फोंडा : धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा भागात पट्टेरी वाघ मृतावस्थेत सापडल्याने  खळबळ माजली असून या घटनेमुळे वनखाते खडबडून जागे झाले आहे. येथील आगलोत देऊळमळ व मुर्गे वाड्यांना लागून असलेल्या खासगी वनक्षेत्रात शनिवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत हा मृत पट्टेरी वाघ आढळून आला. त्याच्या शरीराचे भाग तीन ठिकाणी विखुरलेले असून नखे व दात गायब असल्याचेही निदर्शनास आले आहे. गोव्यातील जंगलात पट्टेरी वाघांचा मृत्यू होण्याची ही सहावी घटना आहे.

Advertisement

पंधरा दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाला असावा

साकोर्डा व बोळकर्णे भागात पट्टेरी वाघाचा संचार असल्याचे महिन्याभरापूर्वी काही स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. वनखात्यालाही त्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे मृत झालेला हा वाघ तोच आहे, की दुसरा हे स्पष्ट झालेले नाही. शिवाय या वाघाचा मृत्यू एखाद्या अपघातात, शिकारीमुळे की अन्य कुठल्या कारणाने झालेला आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र त्याचा मृत्यू पंधरा दिवसांपूर्वी झाला असावा. त्याचे दात व नखे कुणीतरी गायब केली असावीत किंवा त्याच्या मृत्यूनंतर अन्य प्राण्यांकडून ती विखुरली जाण्याची शक्यताही काही प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी हा वाघ मृतावस्थेत सापडला ती जागा देऊळमळ-मुर्गे या अंतर्गत रस्त्यापासून काही अंतरावर आहे. तेथून लोकवस्तीही लांब असून खासगी वनक्षेत्राचा हा भाग मोले महावीर अभयारण्याला लागूनच आहे.

पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 वा. त्यांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याने मुख्य रस्त्यावर येऊन त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कुळे येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयाला भेट दिली असता, तेथे कुणीच नव्हते. उपवनपालांशी संपर्क झाल्यानंतर वनखात्याचे पथक सायंकाळी 4 वा. घटनस्थळावर पोचले. पंचनामा व अन्य सोपस्कार पूर्ण कऊन मृत वाघाचे अवशेष पुढील सोपस्कारांसाठी ताब्यात घेण्यात आले.

पट्टेरी वाघाचा संचार आढळूनही वनखाते सुस्त : राजेंद्र केरकर

पट्टेरी वाघाचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याला वनखात्याची अकार्यक्षमताही तेवढीच कारणीभूत आहे. वर्ष 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार गोव्यात 5 पट्टेरी वाघ असल्याची नोंद झाली आहे. भगवान महावीर अभयारण्य ते मोले राष्ट्रीय उद्यान या राखीव जंगलपट्ट्यात वाघांचे भ्रमण असल्याने या भागात वनखात्याने संवेदनशिलता दाखवून अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. नियमित मॉनिटरींग, शिकार प्रतिबंधक भरारी पथकांची सक्रियता व अन्य आवश्यक उपाययोजनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. मात्र वन्यजीव विभागाचा एकंदरित कारभार सुस्तपणे चाललेला दिसतो. साकोर्डा भागात पट्टेरी वाघाचा संचार असल्याचे निदर्शनास आणूनही आवश्यक पावले उचलली जात नाहीत, ही उदासिनता अशा घटनांप्रती प्रश्न उपस्थित करतात, असे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.