Konkan News : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत 'डॉल्फीन'
या घटनेमुळे पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिक, पर्यटकांना वाळूमध्ये एक मृत डॉल्फिन आढळून आला. बुधवार 4 जून रोजी सकाळी ही घटना समोर आली. येथील किनाऱ्यावर डॉल्फिन लागलेला पाहून अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. तो मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वनविभागाला कळवण्यात आली.
त्यानंतर त्या डॉल्फीनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणेने कार्यवाही हाती घेतली होती. समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसते. येथील किनाऱ्यांवर व्हेल मासेही अशाप्रकारे अनेकदा मृत वा जिवंत अवस्थेत आढळून आले आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.