‘दादा’गिरी मुळे राष्ट्रवादी रिचार्ज; प्रशासन अलर्ट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना बळ
कानपिचक्यांमुळे प्रशासनाकडून कामांची गती वाढणार; पक्ष संघटनेचा आढावा घेऊन सक्षमीकरणासाठी दिल्या सूचना
कृष्णात चौगले कोल्हापूर
प्रशासकीय कार्यपद्धतीचा गाढा अभ्यास, ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला’ अशा कार्यशैलीसाठी प्रचलित असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यात विकासकामांसह राष्ट्रवादीच्या पक्ष बांधणीचा सविस्तर आढावा घेतला. विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारून ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांना सक्षम पक्ष बांधणीचा संदेश मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 15 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यानंतर सोमवारी झालेला त्यांचा दुसरा दौरा होता. कोल्हापुरातील राष्ट्रवादीची (अजित पवार गट) पक्षीय संघटनात्मक बांधणी पाहता ती शरद पवार गटापेक्षा खूप भक्कम आहे. जिह्यातील सर्वच मातब्बर नेते आणि पक्षाचे पदाधिकारी अजित पवार गटामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सक्षम पक्षीय व्यासपीठ मिळाले. त्या तुलनेत शरद पवार गटाला पुन्हा नव्याने बांधणी करावी लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री पवार यांनी जिह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिह्यात आपल्या गटाचा दबदबा कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
विकासकामांचा आढावा अन् हद्दवाढीबाबत मवाळ भूमिका
अजित पवार यांनी गंगावेस तालीम भेट, जिह्यातील विकासकामांचा आढावा, भीमा कृषी प्रदर्शनास भेट, गोकुळ दूध संघाचा हिरकमहोत्सवी कार्यक्रमासह अन्य काही कार्यक्रमाला सोमवारी हजेरी लावली. विकासकामांचा आढावा घेत असताना काम निहाय वस्तूस्थिती जाणून घेतली. यामध्ये प्रलंबित कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी देखील केली. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत त्यांनी ठोस भूमिका घेतली असली तरी हद्दवाढीबाबत मात्र थोडी मवाळ भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूरच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत तत्काळ निर्णय घेऊ असे सूचित होते. पण सोमवारच्या दौऱ्यामध्ये हद्दवाढीबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले. शहराचा सर्वांगिण विकास हवा असेल तर हद्दवाढ गरजेची आहे. त्यासाठी शहरालगतच्या गावातील नागरीकांची समजूत काढून स्थानिक पातळीवर हे प्रश्न निकाली काढावे असे आवाहन केले. यामधून त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे स्पष्ट झाले.
स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागणार
विभाजनापूर्वी जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र पाहता दिवंगत मंत्री दिग्वीजय खानविलकर यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व काही तालुक्यांपुरते मर्यादित राहिले. करवीर, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर, दक्षिण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. विभाजनानंतर त्यामध्ये फार काही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीमध्ये अजित पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी जिह्यातील नेत्यांना झगडावे लागणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या देऊन अंग झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला विश्वास
राष्ट्रवादीचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना तडकाफडकी पदावरून दूर करत जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे. या बदलामागे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे बिद्री साखर कारखान्याचे राजकारण असले तरी अजित पवार यांच्या सूचनेनुसार पक्षामध्ये नवीन चेहरे पुढे आणण्याची कार्यवाही सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये निश्चितपणे भाकरी परतण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच जिह्यातील जुन्या चेहऱ्यांना प्रदेश पातळीवर स्थान देऊन जिल्हा पातळीवर नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे धोरण निश्चित केले आहे. पक्षाचे काम न करता जे पदाधिकारी केवळ खुर्ची उबवत आहेत, त्यांना तत्काळ दूर करणार असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत.
कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी सोमवारी सकाळी सुमारे दीड तासांची वेळ राखीव ठेवली होती. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी हितगुज करून त्यांचे समाधान केले. जिह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा त्यांनी कानमंत्र दिला.
राष्ट्रवादीचा आलेख उंचावणार काय ?
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकांमधील गेल्या दहा वर्षातील वाटचाल पाहता राष्ट्रवादीचा आलेख उंचावण्याऐवजी तळाला गेल्याचे चित्र आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आदी प्रमुख सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जिह्यातील इतर पक्षांच्या तुलनेत प्रबळ असल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. अजित पवार गटाकडे ही सर्व सत्ताकेंद्रे असली तरी जिह्यातील पक्षाची ताकद वाढविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.