सनरायजर्स हैदराबादचा 9 धावांनी विजय
दिल्लीच्या शॉर्ट आणि मिचेल मार्श यांची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 40 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 9 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 198 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 6 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली संघातील मिचेल मार्शची अष्टपैलू कामगिरी वाया गेली. या स्पर्धेतील दिल्लीचा हा सहावा पराभव आहे. तर हैदराबादने आपला तिसरा विजय नोंदवित सहा गुण मिळविले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला मात्र 4 गुणासह शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.
फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 11 षटकात 112 धावांची शतकी भागिदारी केली. पण हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर दिल्लीच्या इतर फलंदाजांना हैदराबादचे आव्हान पेलवले नाही. शेवटच्या क्षणी अष्टपैली अक्षर पटेलने 14 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 29 तर रिपल पटेलने 8 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. पण त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. दिल्लीच्या डावाला पहिल्याच षटकात धक्का बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर भुवनेश्वर कुमारच्या दुसऱ्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फिल सॉल्टने 35 चेंडूत 9 चौकारांसह 59 धावा झोडपल्या. मार्कंडेने स्वत:च्याच गोलंदाजीवर सॉल्टला टिपले. अभिषेक शर्माने मनिष पांडेला एका धावेवर यष्टीरक्षककरवी यष्टीचीत केले. अकिल हुसेनने मिचेल मार्शला झेलबाद केले. त्यांनी 39 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारासह 63 धावा जमविल्या. गर्गने 9 चेंडूत 1 चौकारासह 12 तर सर्फराज खानने 1 चौकारासह 9 धावा केल्या. दिल्लीच्या डावात 8 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. हैदराबादतर्फे मार्कंडेने 2 तर भुवनेश्वर कुमार, अकिल हुसेन, टी. नटराजन व अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघातील मिचेल मार्श वगळता इतर गोलंदाजांना हैदराबाद संघाच्या फलंदाजांना रोखता आले नाही. सलामीच्या अभिषेक शर्माने 36 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 67 धावा तर क्लासनने 27 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 53, अब्दुल समादने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 28, अकिल हुसेनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 तसेच राहूल त्रिपाठीने 6 चेंडूत 1 षटकारासह 10 आणि कर्णधार मारक्रेमने 8 धावा जमविल्या. हैदराबाद संघाने पॉवर प्ले दरम्यान 6 षटकात 62 धावा जमविताना 2 गडी गमाविले. हैदराबाद संघाचे पहिले अर्धशतक 31 चेंडूत तर शतक 66 चेंडूत आणि दिडशतक 97 चेंडूत फलकावर लागले. अभिषेक शर्माने 25 चेंडूत तर क्लासनने 25 चेंडूत आपली अर्धशतके पूर्ण केली. हैदराबादची मधली फळी लवकर कोलमडली. अभिषेक शर्मा समवेत मारक्रेमने तिसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मा पाचव्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. त्यानंतर अब्दुल समाद आणि क्लेसन यांनी सहाव्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. दिल्लीतर्फे मिचेल मार्शने 27 धावात 4 तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हैदराबादच्या डावात 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. हैदराबादच्या डावात अवांतर 10 धावा मिळाल्या.
संक्षिप्त धावफलक - सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 6 बाद 197 (अभिषेक शर्मा 67, अगरवाल 5, त्रिपाठी 10, मारक्रेम 8, ब्रुक 0, क्लासन नाबाद 53, अब्दुल समाद 28, अकिल हुसेन नाबाद 16, अवांतर 10, मिचेल मार्श 4-27, इशांत शर्मा 1-31, अक्षर पटेल 1-29).
दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकात 6 बाद 188 (वॉर्नर 0, सॉल्ट 59, मिचेल मार्श 63, पांडे 1, गर्ग 12, सर्फराज खान 9, अक्षर पटेल नाबाद 29, रिपल पटेल नाबाद 11, अवांतर 4, मार्कंडेय 2-20, भुवनेश्वर कुमार, अकिल हुसेन, टी. नटराजन आणि अभिषेक शर्मा प्रत्येकी 1 बळी).