दांडेलीत दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार
तीन कुत्री केली फस्त : ग्रामस्थांत भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची मागणी
न्हावेली / वार्ताहर
दांडेली-वरचावाडा येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार ग्रामस्थांना दिसून आला. चार दिवसात तीन कुत्री बिबट्याने फस्त केली तर एक कुत्रा बचावला. भर वस्तीजवळ बिबट्याचा सुरू असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तत्काळ सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी केली आहे. वरचावाडा येथील परेश दाभोलकर यांच्या घराजवळ गेले चार दिवस बिबट्याचे दर्शन होत आहे. घरानजीक रानटी प्राणी आल्याने लहान मुलांना बाहेर फिरणे पण धोकादायक बनले आहे. गेल्या चार दिवसात बिबट्याने एक एक करून तीन कुत्री फस्त केली तर सूर्या नाईक यांचा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून बचावला. दिवसा ढवळ्या बिबट्याचा घरानजिक सुरू असलेला संचार भीतीदायक आहे. त्यामुळे वनविभागाने सदर बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी केली आहे.