दयानंद बांदोडकर मार्गावर खासगी कार्यक्रमास बंदी; महापौर रोहित मोन्सेरात यांची माहिती, वाहतूक कोंडी सोडवणार
पणजी: राजधानी पणजीतील मांडवी किनारी असलेल्या वाहतुकीने व्यस्त असलेल्या दयानंद बांदोडकर या प्रमुख मार्गावर यापुढे खासगी कार्यक्रम, स्पर्धा यासाठी बंदी घालण्यात येणार असून तेथे त्याकरिता ना हरकत दाखला (एनओसी) मिळणार नाही, असे सुतोवाच पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी केले आहे.
मागील रविवारी बांदोडकर मार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. पणजीतून बाहेर जाण्यासाठी असलेली बांदोडकर मार्गाची लेन बंद केल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. त्यांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. त्यांच्या तक्रारी महापौर मोन्सेरात यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, सरकारी तसेच कला-संस्कृती आणि पणजी शहराची शान वाढवणारा कार्यक्रम असेल व त्या विषयाच्या अनुषंगाने स्पर्धा ठेवली तर त्यांना या बंदीतून वगळण्यात येईल आणि मान्यता देता येईल.
कांपाल मैदानावर सायंकाळी खासगी कार्यक्रम असल्याने तेथेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्या कोंडीत एक रुग्णवाहिका सापडली आणि ती अडकून राहिल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. हा प्रकारही मोन्सेरात यांच्याकडे कळवण्यात आला आहे. हा विषय आगामी पणजी मनपाच्या बैठकीत चर्चेसाठी येणार असून त्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता मोन्सेरात यांनी बोलून दाखवली. राजधानी पणजीत वाहतूक कोंडी नित्याचीच असून ती वाहनचालकांच्या अंगवळणी पडलेली आहे.
